सोलापूर - जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता रुग्णांच्या उपचारांसाठी सोलापुरातल्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणखी बेडची आवश्यकता आहे.त्यामुळे बेडची संख्या आणखी 100ने वाढवण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली. बेडची संख्या वाढवण्याबाबत शंभरकर यांनी वैद्यकीय विभागाची व्यापक आढावा बैठक घेतली. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सभागृहात ही बैठक झाली.
कोरोना रुग्णांवर उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमधील बेडची संख्या वाढवणे आवश्यक आहे,असे जिल्हाधिकारी शंभरकर यांनी बैठकीत सांगितले. सिव्हिल हॉस्पिटलमधील बी ब्लॉकमध्ये 20 आयसीयू बेड आणि 80 ऑक्सिजन सुविधा असणारे बेड वाढवायचे आहेत. त्या पध्दतीने तयारी करा, अशा सूचना जिल्हाधिकारी शंभरकर यांनी दिल्या.
आयसीएमआरच्या मार्गदर्शक सूचनांनुसार 100 बेडचा कोरोना वॉर्ड तयार करताना काळजी घ्यायला हवी, असे मत तज्ज्ञ समितीच्या डॉ. शशिकला सांगळे यांनी व्यक्त केले. सांगळे यांनी केलेल्या सूचनेनुसार बी ब्लॉकमध्ये 20 आयसीयू बेड आणि 80 ऑक्सिजन सुविधा असणारे बेड तयार करताना बदल करून घ्यावेत, अशा सूचना जिल्हाधिकारी शंभरकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष शेलार यांना दिल्या.
सिव्हील हॉस्पिटलमध्ये बेडची संख्या आणखी 100ने वाढवण्यात येणार आहे, त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सिव्हील हॉस्पिटलच्या बी आणि सी ब्लॉकला भेट दिली. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष शेलार यांनी इमारतीमध्ये फेरबदल करुन कशी रचना करता येईल, याची माहिती जिल्हाधिकारी आणि इतर अधिकाऱ्यांना दिली. यावेळी महापालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव जाधव, अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर, जिल्हा शल्य चिकित्सक प्रदीप ढेले, कोरोना विभाग प्रमुख डॉ. प्रसाद,अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे, आदी उपस्थित होते.
नव्याने वाढवण्यात येणाऱ्या 100 बेडसाठी सुमारे पाचशे जणांचे मनुष्यबळ लागेल.यामध्ये सुमारे 140 डॉक्टर्स, 240 नर्सेस आणि 180 सफाई कर्मचारी यांची आवश्यकता आहे, असे डॉ. ऋत्विक जयकर यांनी सांगितले.