सोलापूर - सोलापूर शहरांमध्ये कोरोना व सारीचे रुग्ण वाढत आहेत. विभागीय कार्यालय क्र. 6 येथील प्रतिबंधित क्षेत्रातील देगाव, साठे-पाटील वस्ती आदी ठिकाणी जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर व महापालिका आयुक्त दीपक तावरे यांनी भेट देऊन पाहणी केली. शहरातील प्रतिबंधित क्षेत्रातील ज्येष्ठ नागरिकांसाठी आधारकेंद्र सुरू करण्यात आली आहेत. या आधार केंद्राच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांना आरोग्य विषयक मदत करण्यात येणार आहे. तसेच त्यांच्यावर लक्षही ठेवण्यात येणार असल्याची माहिती यावेळी महापालिका आयुक्त दीपक तावरे यांनी दिली.
यावेळी नगरसेवक गणेश वानकर, डॉक्टर तसेच आरोग्य सेविका आणि आशा वर्कर उपस्थित होते. प्रतिबंधित क्षेत्रातील करण्यात येणाऱ्या उपाय योजनाबद्दल जिल्हाधिकाऱ्यांनी माहिती घेतली. त्या ठिकाणी सारी व कोरोना रुग्ण असून त्याची माहिती नगरसेवक गणेश वानकर यांनी दिली. तसेच त्या भागातील परिस्थितीची माहिती घेण्यात आली. कोणत्याही रुग्णांस ताप, खोकला, सर्दी असल्यास पुढे येऊन तपासणी करून घेण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले. प्रतिबंधित क्षेत्रातील ज्येष्ठ नागरिक सुरक्षित राहण्यासाठी त्यांना कोरोना व सारीचा संसर्ग लागू नये, म्हणून महापालिकेच्या वतीने तीन ठिकाणी आधार केंद्र सुरू करण्यात आले आहे.
कोरोना संसर्गजन्य रोग रोखण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचे यावेळी त्यांनी संगितले. संपूर्ण शहरातील ज्येष्ठ नागरिकांची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाकडून महापालिकेला मिळालेली आहे. गंभीर आजारी ज्येष्ठ नागरिकांची माहिती सर्व हॉस्पिटल, वैद्यकीय व्यावसायिक यांचे मार्फत मिळविण्यात येत आहे. या सर्व ज्येष्ठ नागरिकांचे सर्वेक्षण तसेच त्यांना उपचारासाठी व प्रतिकार शक्ती वर्धनासाठी महापालिका आरोग्य विभाग प्रयत्नशील असल्याची माहिती महापालिका आयुक्त दीपक तावरे यांनी दिली.