पंढरपूर - दरवर्षी लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीत होणारा आषाढी एकादशीचा सोहळा यंदा कोरोनामुळे मोजक्या लोकांच्या उपस्थितीत पार पडला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांची पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते शासकीय महापूजा करण्यात आली. यावेळी मंत्री आदित्य ठाकरे, सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे, मिलिंद नार्वेकर उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांसोबत शासकीय महापूजेत सहभागी होण्याचा मान वीणेकरी विठ्ठल ज्ञानदेव बडे यांना मिळाला. विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय पूजा करणारे उद्धव ठाकरे हे शिवसेनेचे तिसरे तर ठाकरे घराण्यातील पहिलीच व्यक्ती ठरली.
उद्धव ठाकरे यांच्यापूर्वी शासकीय महापूजा करण्याचा पहिला मान शिवसेनेचे माजी मुख्यमंत्री म्हणून मनोहर जोशी आणि नारायण राणे यांना मिळाला होता. त्यानंतर शिवसेनेचा मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांना तिसऱ्यांदा हा मान मिळाला आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेच्या वेळी दर्शनाच्या रांगेतील वारकरी दाम्पत्याची वारकरी प्रतिनिधी म्हणून निवड केली जात असते. मुख्यमंत्र्यांच्या सोबत पूजा करण्याचा मान त्या वारकरी पती-पत्नीस दिला जातो.
पण यंदा दर्शनाची रांग नसल्यामुळे हा मान विठ्ठल ज्ञानदेव बडे (वय ८४, रा. चिंचपूर- पागूळ, ता. पाथर्डी, जि. अहमदनगर) यांना देण्यात आला आहे. बडे हे सहा वर्षांपासून मंदिरात वीणा वाजवून पहारा देत आहेत. ते स्वतः त्यांचे कुटुंबीय देखील माळकरी आहेत. तीन महिन्यांपासून लॉकडाऊन असताना देखील पूर्णवेळ ते मंदिरात सेवा करीत आहेत.
कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे यंदा मोजक्याच पालख्यांना परवानगी देण्यात आली. तसेच शासकीय पूजाही मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत पार पडली. या एकादशीच्या निमित्ताने, विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने, विठ्ठल रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यास शोभेच्या जांभळ्या, पांढऱ्या व गुलाबी रंगाच्या फुलांनी सुंदर अशी सजावट करण्यात आली आहे.