सोलापूर - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरासह जिल्ह्यातील सर्व दूकाने बंद ठेवण्याचा आदेश दिल्यानंतर सर्व बाजारपेठ बंद केल्याचे पाहायला मिळाले. जिल्ह्यातील पंढरपूर, बार्शी यासारख्या मोठ्या शहरातील बाजारपेठाही बंद ठेवण्यात आल्या असल्या तरी रस्त्यावर मात्र गर्दी पहायला मिळत आहे.
सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सोलापूर जिल्ह्यातील सर्व दूकान बंद ठेवण्याचा आदेश दिलेला आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दूकान बंद ठेवायचा आदेश आल्यानंतर सोलापूर शहरातील सर्व बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या आहेत. तसेच मागील २ दिवसापूर्वी शहर व जिल्ह्यातील सर्व पानपट्टी देखील बंद ठेवण्याच्या आदेश देण्यात आले होते. मात्र, कालपर्यंत पानटपऱ्या बंद झालेल्या नव्हत्या. काल पोलिसांनी जिल्ह्यातील 50 पेक्षा अधिक पानटपऱ्यावर गून्हे दाखल केल्यामुळे आज सोलापूर शहरातील सर्व पानटपऱ्या बंद असल्याचे पहायला मिळाले.
सोलापूर शहर व जिल्हा हा पूणे जिल्ह्याला लागून असल्यामुळे येत्या काळात कोरोनाचा सर्वात जास्त फटका हा सोलापूरला बसण्याची दाट शक्यता आहे. सोलापूर शहर व जिल्ह्यातील 3 लाखापेक्षा जास्त लोक हे पुण्यात वास्तव्यास आहेत. पुण्यातील परिस्थितीमुळे सर्वजण हे परत गावाकडे निघाले आहेत. या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून सोलापूर जिल्ह्यातील सर्व दूकाने बंद करण्याचा आदेश काढण्यात आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर बाजारपेठा आणि दूकाने बंद असली तरी रस्त्यावर मात्र गर्दी पहायला मिळत आहे. पंढरपूरातील चंद्रभागेच्या वाळवंटात पार पडणारे सर्व विधी हे 31 मार्चपर्यंत बंद करण्यात आले आहेत. तसेच वाळवंटामध्ये पूजा अर्चा करणाऱ्या पुजाऱ्यांना देखील सूचना देण्यात आलेल्या आहेत.