सोलापूर - विधानसभा निवडणुकीत परस्परविरोधी आरोप-प्रत्यारोप केल्याच्या कारणावरून सोलापूर नजीकच्या बाळे गावात भाजप आणि वंचितच्या कार्यकर्त्यांत हाणामारी झाली. या मारहाणीत जखमी झालेल्या दोन्ही गटाच्या तिघांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात भाजपचे विद्यमान पालकमंत्री विजयकुमार देशमुख आणि वंचितचे आनंद चंदनशिवे यांच्यात प्रमुख लढत झाली. या निवडणुकीत बाळे गावांत स्थानिक मुद्द्यांवरून परस्परांवर वैयक्तिक स्वरूपाचे आरोप करण्यात आले होते. त्या आरोपांचे पर्यवसान आजच्या मारहाणीत झाले. वंचितच्या एका कार्यकर्त्यांने दारुच्या नशेत मारामारीला सुरुवात केली. सोलापूर शहरातील कार्यकर्त्यांनी जाऊन बाळ्यात राडा केला. प्रत्युत्तरादाखल ही मारहाण करण्यात आली. भाजपचा कार्यकर्ता राजू आलूरे (वय 45 वर्षे, रा.बाळे) आणि वंचितचे सौदागर क्षिरसागर (वय 29 वर्षे, रा. वीर फकिरा चौक, बुधवार पेठ), मनोज जनार्दन थोरात (वय 29 रा. बुधवार पेठ) असे जखमीचे नावे आहेत. याबाबत सिव्हिल पोलिस चौकीत प्राथमिक नोंद झाली आहे.
हेही वाचा - माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी बजावला मतदानाचा हक्क
या प्रकरणी दोन्ही गटाकडून परस्पर विरोधी पोस्ट सोशल मीडियावर टाकण्यात आल्या आहेत. त्यात वंचितच्या समर्थकांकडून दलित युवकांवर प्राणघातक हल्ला झाला असल्याचे पोस्ट करीत सोलापूरचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख, त्यांचे पुत्र नगरसेवक किरण देशमुख यांच्या नावांचा उल्लेख करण्यात आला आहे. तर भाजपच्या गोटातून शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातील वंचितचे उमेदवार आनंद चंदनशिवे यांच्या नावाचा उल्लेख करण्यात येत आहे.
हेही वाचा - सोलापुरातील मतदान केंद्रात मतदारांऐवजी वरुणराजाच बरसला