सोलापूर- केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी लोकसभेत आज अर्थसंकल्प सादर केला. दरम्यान काही जणांनी या अर्थसंकल्पाचे स्वागत केले आहे. तर काही जणांनी अर्थसंकल्पावर टीका करत असताना, सरकारी क्षेत्रातील मोठ्या कंपन्या विकून सरकार देश चालवत असल्याचे म्हटले आहे.
निराशाजनक अर्थसंकल्प
आज सादर करण्यात आलेला अर्थसंकल्प सर्वांची निराशा करणार आहे. टॅक्सच्या स्लॅबमध्ये कोणताही बदल न केल्याने नोकरदार व्यपारी यांची निराशा झाली आहे. तसेच रोजगारवाढीसाठी देखील अर्थसंकल्पामध्ये तरतूद नसल्याने तरुण वर्गामध्ये नाराजी असल्याची प्रतिक्रिया युवक काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते मनोज कुलकर्णी यांनी दिली आहे.
अर्थसंकल्पात अर्थकारण आधीक आणि राजकारण कमी
आज सोमवारी केंद्रीय मंत्र्यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात अर्थकारण अधिक आणि राजकारण कमी असे दिसून आले आहे. असे धोरण दीर्घकाळासाठी असेल तर देशाची अर्थव्यवस्था सुधारल्या शिवाय राहणार नाही. कोरोना सारख्या संकटातून देशाची अर्थव्यवस्था जात असताना कोणत्याही प्रकारचा नवा कर लादला गेला नाही. असे मत सीए श्रीनिवास वैद्य यांनी व्यक्त केले आहे.