सोलापूर - बालविवाह रोखण्यासाठी कायदा आहे. पण, समाजात आजही काही ठिकाणी बालविवाह यासारख्या प्रथा सुरूच आहेत. मुलींचे आई-वडील देखील मुलींचे वय कमी असतानाही बालविवाह करुन संबंधित प्रतिबंधक कायद्याला हरताळ फासत आले आहेत.
माढा तालुक्यातील भुताष्टे गावात मंगळवारी (दि. 3 डिसें.) होणारे दोन बालविवाह विवाह राखण्यात माढा पोलीस आणि माढा पंचायत समितीच्या महिला व बालकल्याण विभागाला यश आले. एका मुलीचे 15 तर दुसऱ्या मुलीचे 17 वय असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
भुताष्टे गावात मंगळवारी दुपारी 12.38 वाजता दोन अल्पवयीन मुलींचा बालविवाह होणार असल्याची तक्रार लग्नपत्रिकेसह अज्ञात व्यक्तीकडून माढा तहसील, माढा पोलीस, चाईल्ड लाईन व पंचायत समितीच्या महिला बालकल्याण विभागाकडे प्राप्त झाली होती. माढ्याचे तहसीलदार राजेश चव्हाण यांनी या तक्रारीची दखल घेत कार्यवाहीचे आदेश दिले होते. त्यानुसार महिला बालकल्याण विभागाचे बालविकास प्रकल्प अधिकारी विनोद लोंढे, माढा पोलीस ठाण्याचे एम.एन लोंढे, एन.व्ही घोळवे यांनी दखल घेत गावात जाऊन याविषयी अधिक माहिती व चौकशी केली. त्यावेळी दोन अल्पवयीन मुलींचे लग्न मंगळवारी होणार असल्याचे समोर आल्याने तक्रारीत तथ्य आढळले. मंगळवारी दुपारी 12.38 वाजता लग्न होणार असल्याने गावातील सलगर वस्ती येथे लग्नाची तयारी करण्यात आली होती. सोमवारी रात्री हळदीचा कार्यक्रम पार पडणार होता. त्या अगोदरच पोलीस व प्रशासनाने हा बालविवाह रोखण्यात यश मिळवले.
हेही वाचा -सोलापूरच्या महापौरपदी भाजपच्या श्रीकांचना यन्नम तर उपमहापौरपदी राजेश काळे यांची निवड
पंचायत समितीच्या विनोद लोंढे, पोलीस कर्मचारी एम.एन.लोंढे यांनी मुलींच्या व मुलांच्या कुटुंबीयांचे समुपदेशन करत त्यांना बालविवाह कायद्याचे महत्व पटवून दिले. त्यानंतर नातेवाईकांना त्यांचे म्हणणे पटले. त्यानुसार मुला-मुलींच्या कुटुंबीयांनी विवाह प्रक्रिया रद्द केली. पंचायत समिती व माढा पोलिसांच्या पथकास गावचे सरपंच सुरेश यादव, पोलीस पाटील सतीश यादव यांचे सहकार्य लाभले.
त्या मुलींची लग्न करणार नसल्याचा घेतला जबाब
18 वर्ष पूर्ण झाल्याशिवाय लग्न करणार नसल्याचा लेखी जबाब मुलींकडून लिहून घेतल्याचे सहायक फौजदार एम. एन. लोंढे यांनी सांगितले.
हेही वाचा - 'सासू'च्या महापौर निवडीवेळी नगरसेवक 'जावई' तटस्थ