सोलापूर - भारत देशाचे पंतप्रधान हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचे असले पाहिजेत, तरच शेतकऱ्यांचे प्रश्न सुटतील. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात सर्व धर्मांचा मोठा आदर होता. त्यांच्या सैन्यदलात सर्व धर्माचे सुभेदार, शिपाई आणि इतर सैनिक होते. त्यांनी कधीच कोणत्याही धर्माचा अनादर केला नाही, असे मत छत्रपती शिवाजी महाराज मुस्लीम ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले. आज शुक्रवारी दिवसभर शिवाजी चौकात शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी एकच लगबग होती. दुपारच्या सुमारास बुरखाधारी महिला आपल्या चिमुकल्यांनासोबत घेऊन अभिवादन करण्यासाठी आल्या होत्या.
शिवाजी महाराजांचे विचार हे सर्वधर्म समभावाचे
छत्रपती शिवाजी महाराज यांनी इ. स. 1674 रोजी महाराष्ट्र राज्यात स्वराज्याची स्थापना केली. मुघलांसोबत कडवी झुंज दिली होती. 1674 रोजी रायगड येथे शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला होता. 1680 साली त्यांचा मृत्यू झाला. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या राज्यात सर्वधर्म समभावाचा संदेश दिला. प्रत्येक धर्माचा आदर केला. एका राजाला शोभेल असे राज्य केले. म्हणून देशाचा पंतप्रधान हा शिवाजी महाराजांच्या विचारांचा असला पाहिजे, असे मत यावेळी मुस्लीम शिवभक्तांनी व्यक्त केले.
पोलिसांनी अतिशय आदराने सर्व बुरखाधारी महिलांना अभिवादनसाठी सोडले-
शिवजयंती निमित्ताने कोणत्याही प्रकारची गर्दी होता कामा नये, म्हणून पोलीस प्रशासनाच्या वतीने अतिशय काटेकोरपणे नियमांची अंमलबजावणी केली जात आहे. गर्दी होऊ नये म्हणून मोजक्याच शिवभक्तांना सोडले जात होते. पण, ज्यावेळी दहा ते बारा बुरखाधारी महिला आपल्या मुलांना छत्रपती शिवरायांचे वस्त्र परिधान करून अभिवादन करण्यासाठी आलेल्या पाहुन पोलिसांनी कौतुक करत सर्वांना प्रवेश दिला. सर्वधर्म समभावाचे संदेश देण्याचे कार्य पोलिसांनी देखील अप्रत्यक्षपणे पार पाडले.
यंदा साध्या पद्धतीने अभिवादन-
छत्रपती शिवाजी महाराज मुस्लीम ब्रिगेडकडून दरवर्षी रंगभवन ते शिवाजी चौक या मार्गावर मोठी मिरवणूक काढून मोठ्या उत्साहाने छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले जाते. पण, यंदा कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर मिरवणूक काढली नाही. फक्त काही मोजक्या महिलांनासोबत घेऊन आणि आपल्या चिमुकल्यांना शिवाजी महाराजांचे वस्त्र परिधान करून अभिवादन केले.