पंढरपूर (सोलापूर) - पुणे परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे उजनी धरण 111 टक्के भरले आहे. तसेच उजनी धरणातून 15 हजार क्युसेक तर वीर धरणातून 14 हजार 500 क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे. यामुळे चंद्रभागेच्या नदीपात्रामध्ये 29 हजार क्युसेक पाणी आहे. चंद्रभागा नदीत पाणी सोडण्यात येत असल्याने पंढरपूर येथे चंद्रभागा दुथडी भरून वाहू लागली आहे. यामुळे वाळवंटातील मंदिरांना पाण्याचा वेढा पडला आहे.
मागील काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा हजेरी लावली. सध्या उजनी धरणात दौंड येथून 6 हजार तर बंडगार्ड येथून 7 हजार क्युसेक विसर्ग येत आहे. सकाळी धरण 111 टक्के भरले आहे. तर धरणात 223 टीएमसी पाणीसाठा झाला आहे.
नीरा नरसिंगपुर येथे निरा आणि भीमा नदीच्या संगमावर 29 हजार क्युसेक विसर्ग आल्यामुळे भीमा नदीकाठच्या भागात पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
पंढरपुरातील चंद्रभागेच्या वाळवंटातील मंदिरांना पाण्याचा वेढा कायम आहे. तसेच जुना दगडी पूल पाण्याखाली असून भीमा नदी दुथडी भरून वाहत आहे. पुढील काळात धरणक्षेत्रात पावसाचा जोर कायम राहिल्यास भीमा नदीला पूर येण्याची शक्यता आहे.