सोलापूर - उन्हाळ्याच्या ऋतुमध्ये उष्णता वाढते, यामुळे शरीराचा दाह होऊ नये, शरीराला थंडावा मिळावा, यासाठी पाडव्याच्या दिवसापासून श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेला चंदनउटी पूजा सुरु करण्यात आली होती. मात्र, आता वातावरणात थंडावा निर्माण होत असल्यामुळे मंगळवारपासून (दि. 9 जून) चंदनउटी पूजा बंद करण्यात आली आहे.
उन्हाळ्याची सुरुवात होताच श्री विठ्ठलाला दाखवण्यात येणाऱ्या नैवद्यांमध्येही बदल करण्यात आला होता. विठ्ठलाला दाखवण्यात येणाऱ्या पंचपक्वानामध्ये बासुंदी हा पदार्थ बंद करून श्रीखंड हा थंड पदार्थ देण्यात आला होता. चंदनउटी पूजा चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून सुरू करण्यात आली होती.
रोज अंदाजे एक किलो चंदन घोटण्याचे काम मंदिर समितीचे कर्मचारी करतात. एक किलो चंदन घोटल्यानंतर 10 पेले चंदनाचा गंध तयार होतो. 5 पेले चंदन विठ्ठलासाठी, 2 पेले रुक्मिणीसाठी व 3 पेले चंदन उपचाराला वापरण्यात येते आहे. मृग नक्षत्र सुरू होत आहे. यामुळे चंदनउटी पूजा बंद करण्यात येत आहे. त्यामुळे मंगळवारी (दि. 9 जून) चंदनउटी पूजेची सांगता झाली आहे.
श्री विठ्ठलाच्या चंदनउटी पूजेसाठी 17 हजार रुपये तर श्री रुक्मिणी मातेच्या पुजेसाठी 8 हजार 500 रुपये भाविकांकडून घेतले जातात. चंदनउटी पूजा करण्यासाठी भाविकांनी मंदिर समितीकडे नोंदणी केली होती. पण, इच्छुक भाविकांना लॉकडाऊनमुळे चंदनउटी पूजा करण्यासाठी मंदिरात येता आले नाही. यामुळे मंदिर समितीमध्ये काम करणाऱ्या 50 हून अधिक कर्मचाऱ्यांच्याच हस्ते विनामुल्य चंदनउटी पूजा करण्यात आली आहे.
हेही वाचा - कोरोनावर मात करण्यासाठी सोलापूर पोलीस राबविणार विशेष मोहीम