सोलापूर : जिल्हा परिषदेच्या सीईओ मनीषा आव्हाळे यांनी बुधवारी दुपारी शहरात असलेल्या मार्कंडेय नगर, मजरेवाडी, कुमठे येथील जिल्हा परिषद शाळांना भेट दिली आणि इमारतीची पाहणी केली. मध्यान्न भोजन तयार करत असलेल्या स्वयंपाक घराची देखील पाहणी केली. यानंतर विद्यार्थ्यांना देण्यात येणारी खिचडी स्वतः खाऊन त्याचा दर्जा तपासला. जिल्हा परिषद सीईओ स्वतः शाळेत येऊन पाहणी करत असल्याने शिक्षकांची एकच धांदल उडाली होती.
कारणे दाखवा नोटीस : सीईओंनी सोलापूर महानगर पालिकेच्या हद्दीत असलेल्या मार्कंडेय नगर येथील जिल्हा परिषद इमारतींची पाहणी मंगळवारी तर आज बुधवारी मजरेवाडी व कुमठे येथील प्राथमिक शाळांची पाहणी केली. यादरम्यान त्यांनी मुख्याध्यापकांना फैलावर घेतले. कामात हलगर्जीपणा केल्या बद्दल मार्कंडेय नगर येथील शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापकास कारणे दाखवा नोटीस देण्यात आली आहे. सीईओ सोबत जिल्हा शिक्षणाधिकारी संजय जावीर, प्रभारी शिक्षणाधिकारी मल्लिनाथ निंबर्गी उपस्थित होते.
100 शाळा धोकादायक : सोलापूर जिल्ह्यातील १०० शाळांच्या इमारती धोकादायक असल्याचे निदर्शनास आल्यानंतर प्रत्यक्ष फिल्डवर जाऊन सीईओ मनिषा आव्हाळे यांनी मार्कंडेय नगरच्या इमारतीची पाहणी केली. शाळेच्या झालेल्या दुरावस्थेबद्दल त्यांनी तात्काळ मुलांची सुरक्षितता घेण्याबाबत मुख्याध्यापक व विस्तार अधिकारी यांना सूचना दिल्या. मुलांचे व शिक्षकांचे हजेरी रजिस्टर तपासून मुलांशी संवाद साधला. पावसाची तमा न बाळगता महापालिकेच्या हद्दीत असलेल्या शाळांची पाहणी करून सुरक्षिततेच्या सूचना दिल्या.
मजरेवाडी व कुमठे शाळांची पाहणी : कुमठे येथीस धोकादायक इमारतीची पाहणी जिल्हा परिषद सीईओ मनिषा आव्हाळे यांनी केली. दरम्यान पाहणीत अती धोकादायक असलेल्या सहा शाळा खोलीतील मुलांना दुसरीकडे बसण्याच्या सूचना दिल्या. मजरेवाडी येथील अंगणवाडीची खोली धोकादायक असल्याने विद्यार्थ्यांना अंगणवाडीसाठी सुरक्षित ठिकाणी बसविण्याच्या सूचना दिल्या. कुमठे येथे स्वत: आहाराची तपासणी केली.
सीईओ यांनी घेतला खिचडीचा आस्वाद : मजरेवाडी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत सीईओ आव्हाळे यांनी मुलांना शालेय पोषण आहार अंतर्गत देण्यात येणाऱ्या आहाराची पाहणी केली. धान्याची स्वच्छता, सुरक्षितता, दर्जा व गुणवत्तेची पाहणी करून खिचडी स्वत: खाऊन पाहिली. तांदळापासून बनविलेल्या खिचडीमध्ये तुरदाळ, कांदा व भोपळ्यांचा समावेश करण्यात आला होता. मसाले टाकून ही खिचडी बनविण्यात आली होती. आहारात आणखी सुधारणा करण्याच्य सूचनाही त्यांनी दिल्या.