सोलापूर (पंढरपूर) - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष दीपक आबा साळुंखे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पदवीधर व शिक्षक मतदारसंघाची मतदान प्रक्रिया सुरू असताना विना परवाना मतदान केंद्रावर येऊन शासकीय आदेशाचा भंग केल्याप्रकरणी मंगळवेढा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष शशिकांत चव्हाण यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे या प्रकाराबाबत अर्जाद्वारे तक्रार केली. या अर्जाची चौकशी करण्याचे काम जिल्हाधिकाऱ्यांनी पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदार संघाचे नोडल अधिकारी तथा पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना दिले होते. अशाच प्रकारचा गुन्हा सोलापूरचे खासदार जय सिद्धेश्वर स्वामी यांच्याविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसच्या तक्रारीनंतर दाखल करण्यात आला होता.
चौकशी करूनच गुन्हा दाखल -
क्षेत्रीय अधिकारी एस.एल.मेटकरी यांनी पदवीधर मतदान केंद्र क्रमांक ३९४, ३९५, ३९६ याठिकाणचे ४ डिसेंबरचे वेब कास्टिंग रेकॉर्डींगचे अवलोकन केले. त्यात दीपक साळुंखे दोषी आढळले आहेत. त्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी मेटकरी यांनी जलसंपदा विभागाचे दत्तोबा मच्छिंद्र पडवळे यांना आदेश दिले होते. पडवळे यांनी या प्रकरणाची फिर्याद मंगळवेढा पोलिसात दिली. पोलिसांनी दीपक आबा साळुंखे यांच्या विरोधात मतदान केंद्रात विना परवाना प्रवेश करणे, मतदान केंद्रात प्रवेश करून जिल्हाधिकाऱ्यांच्या शासकीय आदेशाचा भंग करणे या गुन्ह्यांसाठी फिर्याद दाखल करुण घेतली आहे.
कोण आहेत दीपक आबा साळुंखे?
दीपक आबा साळुंखे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्ह्यातील मोठे नेते आहेत. शरद पवार यांचे ते निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. सोलापूरमधून विधान परिषदेचे आमदार म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. 2019 आली झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना उमेदवार शहाजीबापू पाटील यांना निवडून आणण्यात दीपक आबा साळुंखे यांचा मोठा वाटा आहे. सध्या ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत.