सोलापूर - कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांवर फूलांची उधळण करणे एमआयएमच्या नेत्याला चांगलेच भोवले आहे. संचारबंदीचा आदेश लागू असताना पाचपेक्षा जास्त लोकांचा जमाव घेऊन शासकीय रुग्णालयात जमा झाल्यामुळे फारूक शाब्दी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोरोनामधून बरे झालेल्या रुग्णांना घरी सोडत असताना सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत पहिल्या दिवशी निरोप देण्यात आला. पालकमंत्री यांच्यासह सोलापूर शहर मध्यच्या आमदार प्रणिती शिंदे, वैद्यकीय अधिष्ठाता, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिकारी यांची उपस्थिती होती. या सर्वांच्या उपस्थितीत सामाजिक अंतर ठेवत, कोरोनामुक्तांना झालेल्यांना निरोप देण्यात आला.
शहर मध्यच्या आमदार प्रणिती शिंदे यांच्या विरोधात आमदारकीची निवडणूक लढविलेले आणि पराभूत झालेले एमआयएम पक्षाचे नेते फारूक शाब्दी यांनी देखील दूसऱ्या दिवशी शासकीय रुग्णालयात जाऊन कोरोनामुक्त झालेल्या रूग्णांवर पूष्पवृष्टी केली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी असताना फारूक शाब्दी यांनी विना परवानगी सोलापुरातील शासकीय रुग्णालयात पाच पेक्षा जास्त लोक जमवून संचारबंदीचे उल्लंघन केल्यामुळे त्यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
हेही वाचा - प्रतिबंधित क्षेत्रात घेतली जातेय स्वच्छतेची विशेष काळजी; आयुक्त दिपक तावरेंची माहिती