पंढरपूर (सोलापूर) - पंढरपूर शहर पोलिसांनी अवैधरित्या वाळू उपसा करणाऱ्या विरोधात जोरदार मोहीम उघडली आहे. जुना अकलूज-पंढरपूर रोड येथे जॅकवेल परिसरात अत्याधुनिक तंत्राच्या ड्रोनच्या सहायाने खात्री करत वाळू उपसा करणाऱ्या आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दुसऱया कारवाई पळशी येथे करण्यात आली असून वाळू वाहतूक करणाऱ्या एका विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. या दोन्ही कारवाईमध्ये लाखोंचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
चंद्रभागा नदीपात्रातील जॅकवेल परिसरात अवैधरित्या वाळू उपसा करणाऱ्या योगेश किसन शिंदे, दीपक भांगे, रोहित बाळासाहेब शिंदे, आजिनाथ शिंदे, लखन कांबळे यांच्यासह इतर चार जणांविरुद्ध पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण पवार यांनी दिली.
गुन्हे प्रकटीकरण शाखेची कारवाई
पंढरपूर शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या कर्मचाऱ्यांनी पंढरपूर शहरातील इसबावी येथे जॅकवेल परिसरात अवैधरित्या वाळू उपसा सुरू असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी जॅकवेल परिसराची अत्याधुनिक तंत्र ड्रोन कॅमेराच्या सहायाने वाळू उपसा होत असल्याची खात्री केली. त्यानंतर आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
20 ब्रास वाळू 13 लाखांचा मुद्देमाल जप्त
पंढरपूर गुन्हे प्रकटीकरण शाखेकडून जॅकवेल परिसरात अवैधरित्या वाळू उपसामध्ये बावीस ब्रास वाळूचा साठा, दोन टेम्पो, मोबाईल, असा 13 लाख 49 हजार किंमतीचा मुद्देमाल वाळू माफियांकडून जप्त करण्यात आला.
दुसरी कारवाई
पंढरपूर तालुक्यातील पळशी येथे अवैधरित्या वाळू उपसा करून एक पिकअप पंढरपूरच्या दिशेने येत असल्याची माहिती मिळाली. त्या माहितीच्या आधारे पोलीस कर्मचारी गणेश काळे यांनी पिकअपवर कारवाई करत पिकअप मधील तीन ब्रास वाळू सह दोन लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सदर पिकअप चालक सुरेश झांबरे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा - सेवानिवृत्त शिक्षकाकडे 20 लाखाची खंडणी मागणाऱ्या तिघांना सांगोल्यात अटक