सोलापूर : पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार भगीरथ भालके आणि भाजपचे उमेदवार समाधान अवताडे यांच्यात सरळ लढत मतदारसंघात बघायला मिळत आहे. आजच्या मतदानासाठी पात्र असलेले साडेतीन लाख मतदार निवडणुकीत उभे राहिलेल्या उमेदवारांचे भवितव्य ठरवणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या उमेदवारांनी आपलाच विजय होईल, असा दावा केला आहे.
मतदारांवर पूर्ण विश्वास - भगीरथ भालके
दिवंगत आमदार भारत नाना भालके यांच्यावर असणारे प्रेम व मतदार संघातील मतदारांचा विश्वास हाच आपल्याला विजयी करेल, असा विश्वास महाविकास आघाडीचे पंढरपूर मंगळवेढा विधानसभेचे उमेदवार भगीरथ भालके यांनी व्यक्त केला. कोरोना नियमांचे पालन करून मतदान करण्याचे आवाहन त्यांनी मतदारांना केले. त्यांनी आपल्या पत्नी व मातोश्रींसोबत मतदानाचा हक्क बजावला.
पंढरपूर शहरातील सांगोला चौक येथील नगरपालिका शाळा क्रमांक 9 येथे त्यांनी मतदान केले.
महायुतीचा उमेदवार विजयी होणार - समाधान आवताडे
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षाचा विजय निश्चित असल्याचा विश्वास उमेदवार समाधान आवताडे यांनी व्यक्त केला. समाधान आवताडे यांनी मंगळवेढा शहरातील इंग्लिश मीडियम स्कूल येथे मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांच्यासोबत पत्नी अंजली अवाताडे यांनीही मतदान केले.
सकाळी नऊ वाजेपर्यंत सहा टक्के मतदान -
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत सकाळी नऊ वाजेपर्यंत सहा टक्के मतदानाची नोंद झाली. शहरी भागात मतदानाचा टक्का वाढताना दिसत आहे. सुमारे एकवीस हजार नागरिकांनी नऊ वाजेपर्यंत मतदानाचा हक्क बजावला आहे.
हेही वाचा - LIVE Updates : पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणूक; सकाळी नऊ वाजेपर्यंत सहा टक्के मतदान..