सोलापूर - मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात तात्पूरती स्थगिती मिळाली आहे. यानंतर मराठा समाजात नाराजीचा सूर उमटत आहे. याच पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सोमवारी सकल मराठा समाजाने जिल्हा बंदची हाक दिली आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये, यासाठी सोलापूर जिल्ह्यातील एस. टी. बससेवा बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी घेतला आहे.
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणास स्थगिती दिल्याच्या निषेधार्थ 21 सप्टेंबर 2020 सोमवारी मराठा समाज आणि मराठा आरक्षणाशी संबंधित असणाऱ्या सर्व संघटनांच्यावतीने सोलापूर जिल्हा बंदची हाक दिली आहे. या बंद काळात अनुचित प्रकार होऊ नये. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी 21 सप्टेंबरला जिल्ह्यातील एस.टी. सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
सद्यस्थितीत जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात आरक्षणाच्या संदर्भात आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी मराठा आरक्षण संघटनेच्यावतीने गावपातळीपासून ते जिल्हा पातळीवर बैठका घेण्यात येत आहे. बैठकांमध्ये तालुका आणि जिल्हा बंद करणे, तसेच खासदार व आमदार यांच्या घरासमोर आसूड ओढो आंदोलन आणि हलगी नाद आंदोलन केले जाणार आहे. आमदार व खासदारांना घराबाहेर पडू न देणे हा यामागील उद्देश आहे. सकल मराठांच्या आंदोलनात सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.