सोलापूर - भाजपने आपला विचार केल्यास ही लोकसभेची पोटनिवडणूक लढवू आणि जिंकू, अशी प्रतिक्रिया माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी दिली आहे. सोलापूरचे खासदार जय सिध्देश्वर महास्वामींचे जातीचे प्रमाणपत्र रद्द झाल्यास, आपण सोलापूर लोकसभा पोटनिवडणूक लढण्यास तयार आहोत, अशी इच्छा ढोबळेंनी व्यक्त केली. आज ते पंढरपूर येथील रेस्टहाऊस येथे आल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
खासदार जय सिद्धेश्वर महास्वामींच्या जातीच्या प्रमाणपत्रावर जात पडताळणी विभागाने आपला निर्णय देत, जातीचा दाखला अवैध ठरवला आहे. त्यामुळे सोलापूरात पोटनिवडणूक झाली तर, निवडणूकीसाठी इच्छुक असल्याचे ढोबळे यांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीपूर्वीच लक्ष्मण ढोबळे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
खासदार जय सिद्धेश्वर स्वामी यांनी लोकसभा निवडणुकीवेळी सादर केलेला जातीचा दाखला बनावट असल्याची तक्रार प्रतिस्पर्धी उमेदवार प्रमोद गायकवाड यांनी दाखल केली होती. यावर आज जात पडताळणी अधिकाऱ्यांनी निकाल दिला आहे. जो दाखला निवडणुकीसाठी सादर करण्यात आला आहे तो दाखला अवैध ठरवण्यात आला आहे.