सोलापूर- महाविकास आघाडी सरकारने ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण संपुष्टात आणले असा आरोप भाजपाच्या वतीने करण्यात आला आहे. याचा निषेध म्हणून येत्या 26 जूनला भाजपाच्या वतीने चक्का जाम आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती आमदार जयकुमार गोरे यांनी दिली आहे. ते सोलापूरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. महाविकास आघाडीतील नेते छगन भुजबळ देखील रस्त्यावर उतरत आहेत, ते सरकारचा एक घटक आहेत. मात्र त्यांचे देखील सरकार ऐकत नसल्याचा टोलाही यावेळी आमदार जयकुमार गोरे यांनी लगावला आहे. या पत्रकार परिषदेला बीजेपी शहर अध्यक्ष विक्रम देशमुख, आमदार विजयकुमार देशमुख, महापौर श्री कांचना यनम, आमदार सचिन कल्याणशेट्टी यांची उपस्थिती होती.
ओबीसीच्या राजकीय आरक्षणाच्या मागणीसाठी भाजपाच्या वतीने 26 जूनला चक्का जाम आंदोलन करण्यात येणार आहे. राज्यातील जवळपास एक हजार ठिकाणी एकाच दिवशी हे आंदोलन होईल. आंदोलनाची पूर्ण तयारी झाली असून, प्रत्येक तालुक्यातील मुख्य चौकात चक्का जाम आंदोलन करण्यात येणार असल्याचेही जयकुमार गोरे यांनी म्हटले आहे.
महाविकास आघाडीला मराठा आरक्षण टिकवता आले नाही -
महाराष्ट्र राज्याला अनेक मुख्यमंत्री मराठा समाजाने दिले आहेत. पण एकाही मुख्यमंत्र्याने मराठा समाजाला आरक्षण दिले नाही. मात्र गेल्या पंचवार्षीकला राज्यात भाजपाचे सरकार होते. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होते, त्यांनी मराठा समाजाला आरक्षण दिले होते. ते हायकोर्टात देखील टिकले. मात्र महाविकास आघाडी सरकारला सुप्रिम कोर्टात हे आरक्षण टीकवता आले नाही, अशी टीका देखील यावेळी गोरे यांनी केली.
ओबीसीच्या राजकीय आरक्षणासाठी आंदोलन
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ओबीसींना 27 टक्के आरक्षण होते. मात्र राज्य सरकार बदलल्याने हा मुद्दा न्यायालयात रेंगाळत राहिला. 15 महिन्यानंतर अखेर न्यायालयाने निकाल देत ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द केले. या दिरंगाईला महाविकास आघाडी सरकार जबाबदार आहे. त्यामुळे ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मागणीसाठी येत्या 26 जूनला भाजपाच्या वतीने आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती गोरे यांनी दिली आहे.
हेही वाचा - पुढच्या जन्मी अशी बायको नको रे बाबा!!! पुरुषांनी चक्क पिंपळाच्या झाडाची केली पूजा