सोलापूर - स्मार्टसीटीचे होत असलेली कामे हे नियोजन शून्य सुरू आहे. या कारभारामुळे शहरातील नागरीकांना नाहक त्रास होत आहे. गेली कित्येक महिने झाले निवेदन देऊन देखील कोणतीही सुधारणा कामामध्ये होत नाही. या निषेधार्थ भारतीय जनता पार्टीच्या वतीने नियोजन भवन येथील स्मार्टसीटी कार्यालय समोर आंदोलन करण्यात आले. स्मार्ट सिटीचे कामकाज नियोजनशून्य आहे. ढिसाळ कारभारामुळे शहरातील नागरिकांना वेठीस धरल्यासारखे झाले आहे. जागोजागी रस्ता खोदल्याने खड्डे पडले आहेत. स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांविरोधात पंतप्रधान मोदींकडे तक्रार करणार असल्याची माहिती सत्ताधारी पक्षाच्या वतीने देण्यात आली आहे.
स्मार्ट सिटीच्या कामांवर प्रश्नचिन्ह
सोलापूर शहरामध्ये सुरू असलेल्या स्मार्ट सिटीच्या आढावा बैठकीला स्मार्टसीटीचे सीईओ त्रिम्बक ढेंगळे पाटील हे वेळ देत नाहीत. पंप हाऊसचे डिजाईन केलेले नाही व त्याची मिटिंग घेतली का? आजतागायत स्मार्टसीटीच्या भोंगळ व अपुऱ्या अर्धवट कामामुळे सोलापूर शहरात 3 ते 4 निष्पाप नागरिकांचे बळी गेलेले आहेत. स्मार्टसिटीच्या कामाची मुदत मार्चमध्ये संपलेली आहे. 6 महिने मुदत वाढ देऊनही अद्याप कामे पूर्ण झालेली नाहीत. स्मार्ट सिटीच्या कामाला 6 महिन्याचा विलंब झालेला आहे. सोलापूर महानगरपालिकेची बदनामी करण्यासाठी आपण आलेले आहत का? असे अनेक प्रश्न महापौर श्रीकांचना यन्नम, सभागृहनेते शिवानंद पाटील यांनी उपस्थित केले आहेत.
'सोलापूरचा सचिन वाझे'
येणाऱ्या काळात दोन खासदार आणि आमदार यांच्यामाध्यमातून दिल्लीत अधिवेशनामध्ये एक डेलिगेशन पाठवुन या कामाची चौकशी करण्याची मागणी करणार आहे. सोलापुरातला सचिन वाझें हा सीईओ रुपात आलेला आहे, असा आरोप भाजपा नगरसेवक डॉ. किरण देशमुख यांनी केला आहे.
'पंतप्रधानांकडे तक्रार करणार'
स्मार्ट सिटी योजना ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कल्पनेतील योजना आहे. मात्र सोलापुरात या योजनेला हरताळ फासण्याचे काम केले जात आहे. त्यामुळे या योजनेत आजवर झालेला खर्च, त्या कामाची गुणवत्ता, याबाबत केंद्राच्या तसेच राज्याच्या पथकाकडून तपासणी करावी आणि संबंधीत अधिकाऱ्याला बडतर्फ करावे, अशी मागणी माजी सभागृहनेते सुरेश पाटील यांनी केली आहे. शिवाय यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे तक्रार करणार असल्याची माहिती निदर्शनावेळी देण्यात आली.
यांची होती उपस्ठिती
यावेळी महापौर श्रीकांचना यन्नम, सभागृहनेते शिवानंद पाटील, नगरसेवक डॉ.किरण देशमुख, नागेश भोगडे, माजी सभागृहनेते सुरेश पाटील, माजी सभागृहनेते श्रीनिवास करली, विनायक विटकर, नारायण बनसोडे अविनाश पाटील, अमर पुदाले, राजेश अनगेरी, वैभव हततुरे, नगरसेविका, वंदनाताई गायकवाड, महिला बालकल्याण सभापती कल्पना कारभारी, निर्मला तांबे, राजश्री कणके, सोनाली मुटकरी, संगीता जाधव, सुरेखा काकडे, देवी झाडबुके, बिज्जू अण्णा प्रधाने, श्रीनिवास पुरुड, अजितभाऊ गायकवाड, गिरीष बततुल, सतीश महाले, आदी उपस्थित होते. सत्ताधारी पक्षानेच आंदोलन केल्याने महापालिकेतील प्रशासकीय विभाग हादरले आहे.