बार्शी (सोलापूर) - जागतिक चिमणी दिनानिमित्त चार सामाजिक संघटनांनी संयुक्तपणे उपक्रम राबवून, पक्षांसाठी अन्न, पाणी व निवारा उपक्रमात पुठ्ठ्याच्या नळीची ४०० घरटी, ६०० चारापाणी डबे, ४८० पाण्याचे प्लास्टीकचे टब इत्यादींची निर्मिती व उपलब्धता केली. या उपक्रमाचे ऑनलाईन उद्घाटन जेष्ठ पक्षीमित्र आणि ३४ व्या पक्षीमित्र संमेलनाचे नियोजित अध्यक्ष प्रा.डॉ. निनाद शहा आणि महाराष्ट्र पक्षीमित्र संस्थेचे अध्यक्ष, डॉ. जयंत वडटकर यांच्या हस्ते ऑनलाईन चित्रफित आणि मार्गदर्शनाद्वारे करण्यात आले.
हेही वाचा - सोलापूर जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यात कोरोनाची स्थिती चिंताजनक
वीरशैव विद्या संवर्धिनी मंडळाच्या लिंगायत बोर्डिंग येथे हा उपक्रम पार पडला. यावेळी वीरशैव लिंगायत समाजचे अध्यक्ष विलास रेणके, जाणीव फाउंडेशनचे अध्यक्ष तुळशीदास मस्के, वृक्ष संवर्धन समितीचे अध्यक्ष उमेश काळे, अॅनिमल फ्रेंड्स संघटनेचे अध्यक्ष गणेश वाघमारे यांच्या हस्ते पक्षीमित्र गोविंद बाफणा, प्राणीमित्र धन्यकुमार पटवा यांना प्रातिनिधीक स्वरुपात पक्षांची घरटी आणि चारापाणी डबे देवून वितरणाची सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी आयोजक संस्थांनी उपक्रमाबाबत व वितरणाच्या नियोजनाची माहिती सांगितली.
सध्याच्या परिस्थितीत चिमणी व इतर पक्षांचा खाण्याचा, पिण्याचा व अधिवासाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यांच्या संवर्धनासाठी राज्यभरातून प्रयत्न होत आहेत, त्यात बार्शीही मागे नाही. पक्षीमित्रांनी दुष्काळी जिल्ह्यातील तापमानाच्या परिसरात सावली पाहून चारापाणीचे डबे लावण्याची व्यवस्था केली पाहिजे, जेणेकरून उष्माघात होणार नाही. पाण्याची पातळी तीन इंचापेक्षा अधिकची नसावी, असे आवाहन जेष्ठ पक्षीमित्र प्रा.डॉ. निनाद शहा यांनी केले.
पक्षी हा पर्यावरणातील महत्वाचा घटक आहे. मागील काही वर्षांतील पर्यावरणातील बदल, मानवी हस्तक्षेप आणि अधिवास नष्टता यामुळे पक्षी मोठ्या प्रमाणात कमी होताना दिसत आहेत. प्रदूषण, जंगल, गवताळ प्रदेश, तलाव या ठिकाणचे प्रदूषण व मानवी हस्तक्षेपाने पक्षी कमी होत आहेत. शहरात देखील गेल्या काही वर्षांत पक्षांची संख्या झपाट्याने कमी झाली आहे. खाद्य आणि निवारा कमी झाल्याचेही कारण असल्याने चिवचिवाट कमी झाला आहे. याबाबत काही पक्षी मित्र विविध कार्यक्रम करत असतात, बार्शीतील या उपक्रमामुळे अनेक लाेक पक्षी संवर्धनाकडे, पर्यावरण संवर्धनाकडे वळतील व जनजागृती होईल, असा विश्वास वाटतो, असे अमरावती येथील महाराष्ट्र पक्षीमित्र संस्थेचे अध्यक्ष डॉ. जयंत वडटकर म्हणाले.
हेही वाचा - बार्शीत ऑक्सिजनअभावी दोन रुग्णांचा मृत्यू, प्रशासनाकडून आरोप फेटाळले