पंढरपूर (सोलापूर) - उद्या (गुरुवारी) वारकरी संप्रदायातील महत्त्वाची मानली जाणारी कार्तिकी एकादशी आहे. यानिमित्ताने गुरुवारी पहाटे दोन वाजता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शासकीय महापूजा होणार आहे. तर त्यांच्यासोबतच मानाचे वारकरी म्हणून वर्ध्याच्या दाम्पत्याला पांडुरंगाच्या पूजेचा मान मिळाला आहे. कवडुजी नारायण भोयर (वय ६४) व कुसुमबाई कवडूजी भोयर (वय ५५ रा.मु.डौलापूर, पो. मोझरी शेकापूर, ता.हिंगणघाट, जि. वर्धा) असे या दाम्पत्याचे नाव आहे. याबाबत विठ्ठल मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी माहिती दिली.
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात पहारा देणाऱ्या सहा वीणेकऱ्यांपैकी पांडुरंग चिठ्ठीने कवडुजी नारायण भोयर यांची निवड करण्यात आली. ही निवड 25 नोव्हेंबरला करण्यात आली. कवडुजी भोयर व कुसुमबाई भोयर हे मागील 9 ते 10 वर्षापासून मंदिरात वीणा वाजवून पहारा देत पांडुरंगाची सेवा करत आहेत. मागील 8 महिन्यांपासून लाॅकडाऊन असतानाही त्यांनी पूर्णवेळ मंदिरात सेवा दिली आहे.
कोण असतो मानाचा वारकरी?
आषाढी वारी किंवा कार्तिकी वारीमध्ये वारकऱ्यांमध्ये हा मानाचा वारकरी निवडला जातो. विठ्ठलाची महापूजा करताना जे दाम्पत्य रांगेमधून महापूजेच्या वेळेस सर्वात आधी येतात, त्यांची मानाचा वारकरी म्हणून निवड केली जाते. यानंतर त्यांना मानाचा वारकरी म्हणून आषाढी आणि कार्तिकी वारीला त्यांना महापूजेचा मान दिला जातो. आषाढी एकादशीला मुख्यमंत्री आणि कार्तिकी एकादशीला उपमुख्यमंत्र्यांसोबत हे वारकरी दाम्पत्य शासकीय महापूजा करतात.
कोरोनामुळे....
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता, यावर्षी कार्तिकी यात्रा मर्यादित व प्रतिकात्मक स्वरूपात साजरी करण्यात येत आहे. श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद आहे. त्यामुळे मंदिरात 24 तास पहारा देणारे वीणेकरी यांची उपमुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते होणाऱ्या शासकीय महापूजेसाठी मानाचा वारकरी म्हणून निवड करण्याचा मंदिर समितीने निर्णय घेतला आहे.
हेही वाचा - पंढरपूर शहरासह आसपासच्या नऊ गावांमध्ये संचारबंदी, जिल्हाधिकारी शंभरकर यांचे आदेश
अशी असणार विठ्ठलाची शासकीय महापूजा -
मंदिर समितीच्या सदस्यांच्या हस्ते गुरुवारी पहाटे एक वाजता श्री विठ्ठल-रुक्मिणीची नित्यपूजा केली जाईल. त्यानंतर दोन वाजून वीस मिनिटे ते तीन वाजेदरम्यान श्री विठ्ठलाची तर तीन ते साडेतीन वाजताच्या दरम्यान श्री रुक्मिणी मातेची महापूजा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सपत्नीक होईल. त्यानंतर उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते मानाचे वारकरी दाम्पत्याचा सत्कार केला जाईल. तर मंदिर समितीच्या वतीने पवार यांचाही सत्कार होईल. उपमुख्यमंत्री पवार यांच्यासह मानाचे वारकरी दाम्पत्य यासह विठ्ठल मंदिर कर्मचारी व सदस्य अशा एकूण 25 जणांना मंदिरात उपस्थित राहण्यास परवानगी देण्यात आली आहे.
मंदिर भाविकासांठी बंद -
कार्तिकी वारीमध्ये 25 ते 27 नोव्हेंबर रोजी विठ्ठल-रखुमाईचे मुखदर्शन वारकरी व भाविकांसाठी बंद राहणार आहे. मात्र, 23 ते 24 नोव्हेंबर रोजी ऑनलाइन बुकिंग करून विठ्ठलाचे मुखदर्शन भाविकांना घेता येणार आहे. कोरोना पार्श्वभूमीवर कार्तिक वारीसाठी वारकऱ्यांनी पंढरपूरमध्ये गर्दी करू नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती विठ्ठल मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी दिली.
वारकरी व भाविकांची वाढती मागणी लक्षात घेऊन मंदिर समितीने 23 ते 24 नोव्हेंबर रोजी ऑनलाइन बुकिंग करणाऱ्यांना विठ्ठल-रखुमाईच्या मुखदर्शनाची परवानगी दिली. एका तासाला 200 याप्रमाणे दिवसभरात दोन हजार नागरिकांना विठ्ठलाचे मुखदर्शन घेता येणार आहे. तर 25 ते 27 नोव्हेंबर रोजी प्रतिकात्मक व साध्या पद्धतीने कार्तिकी सोहळा मंदिर समितीकडून पार पाडण्यात येणार आहे. या तीन दिवसांत मंदिर बंद राहणार आहे.