पंढरपूर - राष्ट्रवादीचे दिवंगत आमदार भारत नाना भालके यांचे पूत्र भगीरथ भालके यांची विठ्ठल साखर कारखान्याच्या चेअरमनपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. संचालकांच्या अनुमतीने एकमताने ही निवड करण्यात आली. आमदार भारत नाना भालके यांच्या निधनानंतर हे पद रिक्त झाले होते. दुय्यम निबंधक एस एम तांदळे यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले.
पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार भारत नाना भालके यांचे कोरोनामुळे निधन झाले होते. भारत नाना भालके हे विठ्ठल साखर कारखान्याचे चेअरमन म्हणूनही काम पाहत होते. मात्र त्यांच्या अकाली निधनानंतर विठ्ठल साखर कारखान्याचे चेअरमन पदही रिक्त झाले होते. सोमवारी झालेल्या विठ्ठल कारखान्याच्या संचालक बैठकीमध्ये आमदार भालके यांचे पूत्र भगीरथ भालके यांची सर्व अनुमतानी निवड करण्यात आली. यावेळी सर्व संचालक मंडळांनी त्यांचे अभिनंदन केले.
भारत नाना १८ वर्ष चेअरमन-
2002 मध्ये विठ्ठल सहकारी कारखाना कारखान्याची स्थापना माजी आमदार औदुंबर अण्णा पाटील व वसंतराव काळे यांनी केली होती. विठ्ठल कारखाना उभारण्यापूर्वी औदुंबर आण्णा व वसंतराव काळे यांनी विठ्ठल परिवाराची स्थापना केली होती. विठ्ठल कारखान्यावर आमदार भारत नाना भालके यांची मजबूत पकड होती. भारत नाना भालके यांनी तब्बल 18 वर्ष चेअरमन म्हणून कारखान्याचे काम पाहिले. मात्र गेल्या दोन वर्षापासून विठ्ठल कारखान्याची आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे कारखाना बंद ठेवण्यात आला होता. त्यानंतर महाविकास आघाडी सरकारने विठ्ठल साखर कारखान्याला संजीवनी देण्यासाठी आर्थिक मदत केली होती. त्यामुळे या हंगामात कारखाना सुरू करण्यात आला होता.