सोलापूर - जिल्ह्यात सध्या कोरोनाबाधितांच्या संख्येमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. वाढत्या कोरोना रुग्णांमुळे आरोग्य यंत्रणेवर ताण पडत असून, रेमडेसिवीर आणि ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री दत्तात्रय भरणे हे जिल्ह्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप बार्शीकरांच्या वतीने करण्यात आला आहे. भरणे हे आढावा बैठकीसाठी बार्शीत आले असता, त्यांचा काळे झेंडे दाखवून निषेध करण्यात आला.
पालकमंत्र्यांना दाखवले काळे झेंडे
बार्शी तालुक्यात 400 हून रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दिवसेंदिवस शहरात रुग्णांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर 20 एप्रिलपासून कडक निर्बंध घालण्यात आले आहे. ऑक्सिजन आणि रेमडेसिवीरचा पुरवठा सुरुळीत करण्यासाठी प्रशासन स्थरावर प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान शनिवारी पालकमंत्री कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बार्शीमध्ये आले होते, भरणे यांच्या उपस्थितीत नगरपालिकेत आढावा बैठक पार पडली. मात्र बैठकीपूर्वी नगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर सामाजिक कार्यकर्ते श्रीरंग डोईफोडे, आप्पासाहेब पवार यांनी त्यांना काळे झेंडे दाखवले. तर राजकीय नेत्यांच्या नाकर्तेपणामुळेच रुग्णांची हेळसांड होत आहे. शिवाय अनेकांना जीव ही गमवावा लागला आहे. वेळीच उपचार झाले असते तर ही वेळ आली नसते. औषध उपचार पुरवण्यास सरकारी यंत्रणा कमी पडल्यानेच तालुक्यात संख्या वाढली आणि याला लोकप्रतिनिधी जबाबदार असल्याचा आरोप बालाजी डोईफोडे यांनी केला आहे.
हेही वाचा - कोव्हिशिल्डची किंमत बाजारपेठेत सर्वात कमी; सीरमकडून दराबाबत स्पष्टीकरण