सोलापूर - सोलापुरात गाजलेल्या मटका बुकी प्रकरणात बडतर्फ पोलीस शिपाई स्टीफन स्वामीसह 28 जणांना जामीन मंजूर झाला आहे, अशी माहिती अॅड. मिलिंद थोबडे यांनी दिली. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी केलेल्या कारवाईत 28 जणांना अटक करण्यात आले होते.
न्यू पाच्छा पेठ येथील कोंचीकोरवे गल्लीतील राजभुलक्ष्मी इमारतीत 24 ऑगस्टला गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय जगताप यांनी आपल्या पथकासह छापा टाकला होता. या कारवाईत पोलिसांनी तपास करत 28 आरोपींवर अटक करून कारवाई केली होती. या प्रकरणी एकूण 288 आरोपींची नावे निष्पन्न झाली आहेत. अटकेत असलेल्या 28 आरोपींचा जामीन अर्ज शुक्रवारी (दि. 4 सप्टें) प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एम. सी .शेख यांच्यासमोर ठेवला होता. या गुन्ह्याच्या जामीन अर्जाच्या सुनावणीच्या वेळी या गुन्ह्यात लावलेले 420 कलम हे लागू होत नसल्याचा युक्तिवाद संशयित आरोपींच्या वकिलांनी मांडला. तसेच इतर सर्व आरोपी हे सोलापूर येथील स्थानिक रहिवासी आहेत. त्यामुळे ते कोठेही पळून जाणार नाहीत, असे विविध मुद्दे मांडले. हे मुद्दे ग्राह्य धरून न्यायाधीशांनी प्रत्येकी पंधरा हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर सर्व आरोपींना जामीन मंजूर केला.
यात आरोपीतर्फे अॅड. मिलिंद थोबडे, अॅड. विनोद सूर्यवंशी, अॅड. राजकुमार म्हात्रे, अॅड. श्रीकांत पवार, अॅड. दिनेश भोपळे, अॅड. अमीर बागवान यांनी काम पाहिले तर सरकार पक्षाकडून अॅड. करवते यांनी काम पाहिले.
हेही वाचा - अखेर..! सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षांच्या तारखांचा मुहूर्त मिळाला