सोलापूर- अमोल जगताप आत्महत्या प्रकरणी दशरथ कसबे व नगरसेवक लक्ष्मण जाधव (काका जाधव) यांना एक दिवसाची वाढीव पोलीस कोठडी मिळाली आहे, याबातची माहिती, अॅड. मिलिंद थोबडे व अॅड. इस्माईल शेख यांनी दिली.
सरकारी वकिलांनी कोर्टात बाजू मांडताना, फॉर्चूनर कार जप्त करायची आहे, पैशाच्या व्यवहारातून झालेली कागदपत्रे जप्त करायची आहेत, असा युक्तिवाद केला. यावेळी आरोपींकडून जोरदार हरकत घेण्यात आली. त्यावर कोर्टाने आरोपी दशरथ कसबे व काका जाधव यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
13 जुलै रोजी सायंकाळी अमोल जगताप या ऑर्केस्ट्रा बार चालकाने पत्नी मयुरी व दोन मुलांची हत्या करुन स्वत:ही आत्महत्या केली होती, अशी नोंद फौजदार चावडी पोलीस ठाण्यात आहे. या प्रकरणी व्यंकटेश दंबलदिनी, सिद्धराम बिराजदार, दिनेशकुमार बिराजदार, लक्ष्मण जाधव (काका जाधव), दशरथ कसबे यांना अटक करुन कोर्टासमोर हजर केले होते. कोर्टाने सरकारी वकिलांचे म्हणणे ऐकून ओरोपींना पोलीस कोठडी सुनावली होती.
रविवारी दशरथ कसबे व काका जाधव यांची पोलीस कोठडी संपणार असल्याने पोलिसांनी त्यांना कोर्टात हजर केले. सरकारी वकिलांनी कोर्टासमोर आपली बाजू मांडत सांगितले की, कार जप्त करायची आहे, अमोल जगताप व आरोपी यामध्ये झालेल्या व्यवहराची कागदपत्रे जप्त करावयची आहेत.
यावर आरोपींचे वकील अॅड. मिलींद थोबडे व अॅड. इस्माईल शेख यांनी युक्तिवाद मांडला की, गेल्या तारखेला देखील सरकारी वकिलांनी असेच मत मांडून पोलीस कोठडीची मागणी केली होती.आणखीन त्याच मुद्द्यावर पोलीस कोठडीची मागणी केली जात आहे, असे कोर्टास निदर्शनास आणून दिले.
दोन्ही वकिलांचे युक्तवाद ऐकूण न्यायाधीशांनी दशरथ कसबे व काका जाधव यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. याबाबत अधिक तपास गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप व इतर पोलीस कर्मचारी करत आहेत.