सोलापूर - जिल्ह्यातील बार्शी शहरात एकाच कुटुंबातील चार जणांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अलिपूर रोडवरील ज्ञानेश्वर मंदिर परिसरात हा प्रकार घडला आहे. या घटनेमागील कारण अद्याप अस्पष्ट आहे.
मृतांमध्ये भैरवनाथ कोकाटे यांनी आपल्या कुटुंबीयांसमवेत आत्महत्या केली. यात पत्नी, अल्पवयीन मुलगा आणि मुलीचा समावेश आहे. आपल्या दोन्ही लहान मुलांना विष देऊन कोकाटे दाम्पत्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मात्र, या घटनेमागील नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. भैरवनाथ कोकाटे (वय, 40), मनिषा भैरवनाथ कोकाटे (वय, 36), प्रशांत भैरवनाथ कोकाटे (वय, 15) आणि प्रतीक्षा भैरवनाथ कोकाटे (वय, 11) अशी मृतांची नावे आहेत.
हेही वाचा - Etv Bharat Impact : कोल्हापूरच्या बहुतांश पूरग्रस्त भाडेकरूंना मिळाली सानुग्रह अनुदानाची मदत
या घटनेमुळे संपूर्ण शहरात शोककळा पसरली आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतले असून पुढील तपास करीत आहेत.