सोलापूर - बियाणं पेरल्यानंतर सोयाबीनचे पीक उगवले नसल्याच्या अनेक तक्रारी येत आहेत. त्यामुळे पीक न आलेल्या बियाण्यांचे तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश कृषिमंत्री दादा भुसे यांनी दिले आहेत. तसेच बियाण्यांसंबंधित येणाऱ्या तक्रारींमध्ये दोषी असलेल्या कंपन्यांवर कारवाई करा, असे कृषिमंत्र्यांनी सांगितले आहे.
खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर कृषिमंत्री दादा भुसे यांनी सोलापुरात आढावा बैठक घेतली. संबंधित बैठकीत जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज बिराजदार, विभागीय उपसंचालक दिलीप झेंडे उपस्थित होते.
योग्य प्रमाणात पाऊस झाल्यानंतरच शेतकऱ्यांनी पेरणी करावी, असे आवाहन त्यांनी केले. या बैठकीत खतं, बियाण्यांची उपलब्धता, खरीप पीक कर्ज वाटप, महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील लाभार्थ्यांना पुन्हा कर्ज वितरण करण्यासंबंधी विषयांवर चर्चा झाली. दादा भुसे यांनी सोलापूर जिल्ह्याला मागणीनुसार खताचा पुरवठा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. मागेल त्याला शेततळे, शेततळ्याला कागद आणि इतर योजनांसंदर्भात थकीत अनुदानाचा निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे ते म्हणाले.
सोयाबीनच्या बियाण्याची उगवण न झाल्याच्या तक्रारी आल्या आहेत. याबाबत पंचनामे करा. त्याच कंपनीच्या बियाण्यांबाबत पुन्हा तक्रार आल्यास त्याबाबत पुढील कारवाई करावी लागेल, याकडे लक्ष देण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केल्या आहेत. ज्या बँका पीककर्ज देणार नाहीत त्यांच्यावर कारवाई करण्याची शिफारस करा, असेही कृषिमंत्र्यांनी सांगितले आहे.
यावेळी कृषी अधीक्षक बसवराज बिराजदार यांनी खरीप हंगामाबाबत माहिती दिली. कृषी उपसंचालक रवींद्र माने यांनी प्रस्तावना केली. यावेळी जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे, अग्रणी बँकचे व्यवस्थापक संतोष सोनवणे, निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख, जिल्हा सहकारी बँकेचे व्यवस्थापक किसन मोटे उपस्थित होते.