सोलापूर - जिल्ह्यात पावसाचा जोर लक्षात घेता शेतकऱ्यांनी शेततळ्यातील पाणी किमान दोन फुटापर्यंत कमी करावे, असे आवाहन सोलापूरचे जिल्हा कृषी अधिकारी रवींद्र माने यांनी केले आहे. संभाव्य पूरस्थितीचा धोका टाळण्यासाठी हे आवाहन करण्यात आले आहे. बुधवारी सोलापुरात शहरासह जिल्ह्यात ढगफुटी सदृश परिस्थिती निर्माण झाली होती.
सोलापूर शहरासह जिल्ह्यात पावसाने एकच थैमान मांडले आहे. शहरालगत असलेल्या अनेक ओढ्यांना पूर आला आहे. जिल्ह्यातील तलाव तुडुंब भरली आहेत. नद्या दुथड्या भरून वाहत आहेत. शेतमालाचा व उभ्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. राज्याच्या व जिल्ह्याच्या हवामान खात्याने शनिवारपर्यंत अतिवृष्टी होण्याचा अंदाज वर्तविला आहे. तर शेततळ्यामुळेदेखील मोठा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे जिल्हा कृषी अधिकारी रवींद्र माने यांनी संभाव्य धोका टाळण्यासाठी शेततळ्यातील पाणी कमी करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
जिल्ह्यात 14 ऑक्टोबरपर्यंत सर्वदूर पाऊस होत आहे. काही ठिकाणी पाझर तलाव व साठवण तलाव फुटल्याने शेतीचे प्रचंड नुकसान झालेले आहे. या जलस्त्रोतांचा सांडवा असतो. परंतु शेतामध्ये असलेल्या शेततळ्याला कोणत्याही प्रकारे सांडवा नसतो. शेततळी भरलेली असल्यास शेतकऱ्यांनी पाणी कमी करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा कृषी अधिकाऱ्यांनी केले आहे. ते म्हणाले, की पुन्हा रात्रीनंतर पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेततळे भरून वाहिल्यानंतर शेततळ्याचा भराव खचून शेततळे फुटण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे तात्काळ शेततळ्यामधील पाणी कमी करावे. पाऊस चांगला झाल्याने शेततळे हे ओढ्या नाल्यांमधून वाहणाऱ्या पाण्यातून नंतरही भरून घेता येणे शक्य आहे.