सोलापूर - विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वाहनावर बुधवारी सायंकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास दोन अज्ञात व्यक्तींनी मड्डी वस्ती येथे दगडफेक केली. या प्रकरणाची चौकशी करून ताबडतोब गुन्हा दाखल करावा, अशी मागणी त्यांच्या समर्थकांनी केली आहे. या मागणीसाठी त्यांच्या समर्थकांनी सोलापूर पोलीस आयुक्त कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. यामुळे सोलापुरात तणावाचे वातावरण पसरले आहे.
विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांचा बुधवारी (दि. 30 जून) सोलापूर दौरा होता. दिवसभर आपल्या कार्यकर्त्यांसोबत ओबीसी आणि धनगर समाजाच्या नागरिकांसोबत बैठका झाली. विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर त्यानंतर सायंकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास दोन अज्ञात व्यक्तींनी मड्डी वस्ती येथे त्यांच्या वाहनावर दगडफेक केली. यानंतर दुचाकीवर आलेले हल्लेखोर पसार झाले. हल्ल्यात गोपीचंद पडळकर यांना कोणत्याही प्रकारची इजा झाली नाही.
जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मागे घेणार नाही -
आंदोलकांनी शासकीय विश्राम गृहातुन थेट सोलापूर पोलीस आयुक्त कार्यालय गाठले. यानंतर मुख्य प्रवेशद्वारासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले. तसेच जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत ठिय्या आंदोलन करणार आणि महाराष्ट्र बंदची हाक पुकारणार, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली. दगडफेक झाल्यानंतर याप्रकरणी कोणत्याही प्रकारची पोलीस तक्रार दाखल करणार नाही, अशी माहिती आमदार पडळकर यांनी शासकीय विश्रामगृहात दिली होती. तरी देखील कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त करत ठिय्या आंदोलन केले आहे.
हेही वाचा - रात्र गेली हिशोबात! पोरगं नाही नशिबात; गोपीचंद पडळकरांची शरद पवारांवर टीका