सोलापूर - स्मार्टसिटीच्या कामामुळे समर्थ धोंडीबा भास्कर या 15 वर्षीय अल्पवयीन मुलाचा मृत्यू झाला होता. त्याच्या कुटुंबियांना तातडीने स्मार्ट सिटी योजनेतून ५० लाख रुपये आर्थिक मदत करा व समर्थ भास्करच्या मृत्यूसा कारणीभूत असणाऱ्या प्रशासकीय अधिकारी व कंत्राटदारांवर दखलपात्र गुन्हा दाखल करा, अशी मागणी करत सोलापूर महानगरपालिकेसमोर डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया व स्टूडंट फेडरेशन ऑफ इंडियाच्यावतीने करण्यात आली आहे.
स्मार्ट सिटीचे काम करणाऱ्या ट्रॅक्टरखाली चिरडला गेला समर्थ -
शहरात असलेल्या जुना दत्त मंदिरापासून ते पंचकट्टा दरम्यान स्मार्ट सिटी अंतर्गत कामकाज सुरु आहे. या मार्गावर गुरुवार 10 जून रोजी स्मार्ट सिटीचे कामकाज सुरु असताना रस्त्याच्या दुतर्फा असणाऱ्या दुकानदारांची वाहने, पादचाऱ्यांची गर्दी, वाहतूक सुरु असताना प्रचंड वर्दळीतून रस्ता काढत असताना समर्थ धोंडीबा भास्कर हा 15 वर्षीय अल्पवयीन मुलगा ट्रॅक्टर खाली चिरडला गेला. त्यामुळे तो मुलगा जागीच अवघ्या काही क्षणात दगावला. त्या चिमुकल्या निष्पाप मुलाचा बळी गेला. याला हे स्मार्ट सिटी योजनेचे प्रशासकीय अधिकारी, कंत्राटदार यांच्या बेजबाबदार आणि निष्काळजीपणामुळे घडलेले आहे, असा आंदोलनकर्त्यांनी यावेळी केला.
सर्व आंदोलकाना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल -
समर्थ भास्करच्या कुटुंबीयांना न्याय द्यावा आणि तातडीने आर्थिक मदत करावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आली. पोलिसांनी सर्व आंदोलकांना ताब्यात घेतले. यावेळी कादर शेख, राहुल बुगले, तौसीफ कोरबू, रोहित सावळगी, व्यंकटेश कोंका, पूनम गायकवाड, प्रियंका कीर्तने, बाळकृष्ण मल्याळ, विजय हरसुरे, नरेश गुल्लापल्ली, मधुकर चिल्लाळ, विनायक भैरी, दुर्गादास कनकुंटला, राहुल भैसे, प्रशांत आडम, बाबुराव बंधारम, शिवा श्रीराम, अकिल शेख, बालाजी गुंडे, असिफ पठाण, इलियास सिद्धिकी आदींसह तरुण कार्यकर्ते व विद्यार्थी उपस्थित होते.
हेही वाचा - आजपर्यंत सर्वच राज्यकर्त्यांनी नक्षलवाद्यांना मुख्य प्रवाहात येण्याचे आवाहन केले - अजित पवार