सोलापूर - पंढरपूर येथील विठ्ठल मंदिर आषाढी एकादशीपर्यंत कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बंद ठेवण्यात आले आहे. त्यामुळे भाविकांनी सदर कालावधीपर्यंत पंढरपूर येथे दर्शनासाठी प्रवास करु नये, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी केले आहे.
पंढरपूर येथे दर्शनासाठी जाणाऱ्यांना प्रवासी पास वितरीत करू नये, असे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना विभागीय आयुक्त यांच्यामार्फत कळवण्यात आले असल्याचे डॉ. दीपक म्हैसेकर यांनी स्पष्ट केले. यंदा कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर देहू आणि आळंदी येथील पालखी प्रस्थान सोहळा मोजक्या लोकांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. यावेळी देखील केवळ 50 व्यक्तींनाच कोरोनाबाबतची सर्व काळजी घेण्यास सांगण्यात आले होते. तर महाराष्ट्राची पायी वारीची परंपरा देखील खंडीत करण्यात आली आहे.
संत तुकाराम महाराज यांची पालखी मुख्य मंदिरातून प्रस्थान केल्यानंतर देहूमध्येच इनामदार वाडा येथे आहे. आषाढी एकादशीच्या आदल्या दिवसापर्यंत पालखी तेथेच राहणार आहे. तर संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी देखील प्रस्थानानंतर आळंदीतल्या गांधीवाडा येथे मुक्कामी आहे. त्यामुळे यंदा पालखी प्रस्थान मर्यादित तर पायी वारी रद्द केली असताना, पंढरपूरला देखील भाविकांनी जाऊ नये, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.