सोलापूर - शेलगाव वांगी येथील आदिनाथ सहकारी साखर कारखान्यातील कामगाराने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना 23 जानेवारी रोजी दुपारी दोन ते तीनच्या सुमारास घडली. राजेंद्र बलभीम जाधव (वय - 45, रा. शेलगाव वांगी) असे मृत कर्मचाऱ्याचे नाव आहे.
आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांचे 46 महिन्यांचे वेतन थकीत आहे. यामुळे या कारखान्याच्या कर्मचाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात निराशा निर्माण झाली आहे. कामगारांनी वेगवेगळ्या प्रकारे आंदोलन केले. मात्र, वेतन मिळण्यासंदर्भात कोणत्याही प्रकारचा मार्ग सापडत नसल्याने कामगाराने आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे.
कामगारांनी आयुक्तांकडे जाऊन आपली कैफियत मांडली होती. 9 जानेवारी पासून कामगारांनी साखळी उपोषणाचे हत्यार उपसले होते. तरीदेखील वेतन देण्यासंदर्भात संचालक मंडळाने तडजोड केली नाही. यामुळे जाधव यांच्यावर कुटुंबाचा गाडा हाकताना तारेवरची कसरत करावी लागत होती. या कारणाने राजेंद्र बलभीम जाधव यांनी आत्महत्या केली. जाधव यांच्या मागे दोन मुले आणि पत्नी असा परिवार आहे.
हेही वाचा - समाजात स्वीकारण्यास आजोबांचा नकार, तरुण नातीचा संशयास्पद मृत्यू; जळगावातील धक्कादायक प्रकार