सोलापूर - कामगार मंडळाकडे बांधकाम कामगारांची नोंदणी केली जाते. ही नोंदणी करताना दलालांचा सुळसुळाट आहे. हे दलाल मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करतात. हा भ्रष्टाचार रोखण्यासाठी कामगार कल्याण महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी कंबर कसली आहे. कामगार आयुक्त निलेश यलगुंडे यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली. कामगार कल्याण महामंडळ कार्यालय पूर्णपणे ऑनलाइन झाले आहे. बांधकाम कामगारांनी कोणत्याही दलाललांकडे न जाता ऑनलाइन अर्ज करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
दलालांमार्फत बोगस कामगारांची नोंदणी
शहरातील अनेक खरे बांधकाम कामगार शासनाच्या विविध योजनांपासून वंचित आहेत. बांधकाम कामगाराची नोंदणी ही स्वतः दिलेल्या हमी पत्राच्या आधारे केली जाते. याचाच गैरफायदा दलाल व काही कथित बांधकाम कामगार संघटना घेत आहेत. त्यांच्याकडून बोगस बांधकाम कामगाराची नोंदणी केली जात असल्याने, अनेकवेळा खरे बांधकाम कामगार लाभापासून वंचित राहातात.
शहर व जिल्ह्यातील 45 ठेकेदारांना बाजावल्या नोटीसा
शहर व जिल्ह्यातील 45 ठेकेदारांना कामगार आयुक्त निलेश यलगुंडे यांनी नोटिसा बजावल्या आहेत. यातील बहुतांश ठेकेदारांनी आपल्याकडे कामगार आहेत, अशा प्रकारचे शिक्के मारून गैरप्रकार केला आहे. या नोटीसमध्ये कामगारांचे वेतन, हजेरीपट आदी माहिती देण्याच्या सूचना करण्यात आल्याने, बोगस कामगारांची नोंदणी केलेल्या दलालांचे धाबे दणाणले आहेत.
शासनाची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल होणार
कामगारांची नोंदणी केलेल्या ठेकेदारांना बांधकाम कामगारांचे वेतन व हजेरीपटाबाबत माहिती देण्याचे सांगण्यात आले आहे. ही माहिती सादर न करू शकल्यास त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात येईल. तसेच या कामगारांची नोंदणी रद्द करण्यात येईल, अशी माहिती देखील यावेळी आयुक्तांनी दिली आहे. याबाबत जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर आणि कामगार आयुक्तांची लवकरच बैठक होणार असून, या बैठकीमध्ये काय निर्णय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.