सोलापूर : घरात कोणी नसल्याचा फायदा घेत अल्पवयीन मुलीवर लैंगीक अत्याचार केल्याप्रकरणी तरुणाला दहा वर्षे सक्तमजुरी व 50 हजार रुपये दंडाची शिक्षा झाली. काल जिल्हा व सत्र न्यायाधिश ए. बी. भस्मे यांनी ही शिक्षा सुनावली.
या प्रकरणी भैय्या उर्फ गोपाळ आण्णासाहेब पाटील (वय 19, रा. पाटील वस्ती, रोपळे) याच्या विरोधात अल्पवयीन मुलीच्या आईने कुर्डुवाडी पोलीस ठाण्यात 23 मार्च 2018ला तक्रार दिली होती. लैंगिक अत्याचाराची घटना त्याच दिवशी दुपारी घडली होती. पीडित मुलीचे आई-वडील बाहेर गावी गेलेले होते. त्यावेळी आरोपीने अत्याचार केला. याची वाच्यता कुठे केल्यास तिला जीवे मारण्याची धमकी दिली होती. आई-वडील घरी आल्यानंतर मुलीने झालेला प्रकार त्यांना सांगितला होता.
या खटल्यात दहा साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली. त्यापैकी अल्पवयीन मुलगी, मुलीचे अजोबा, वैद्यकीय अधिकारी, पंच, वैज्ञानिक अहवाल यांच्या साक्षी महत्वपूर्ण ठरल्या. आरोपीच्यावतीने एक साक्षीदार तपासण्यात आला. कुर्डूवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ईश्वर ओंबासे यांनी या प्रकरणाचा तपास केला. अल्पवयीन मुलीवर जबरदस्तीने अत्याचार केला असून त्याला जास्तीत-जास्त शिक्षा द्यावी, असा युक्तीवाद सरकारतर्फे अॅड. दिनेश देशमूख यांनी केला. हा युक्तीवाद मान्य करून न्यायालयाने आरोपीला शिक्षा सुनावली.