पंढरपूर - चार वर्षांपासून फरार असलेल्या एका दरोडेखोराला जेरबंद करण्यात पंढरपूर तालुका पोलिसांना यश आले आहे. पंढरी उर्फ मिथुन किरण काळे या सराईत गुन्हेगाराला पुळूज येथून अटक करण्यात आली आहे. हा आरोपी 2016 पासून पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे.
पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ओलेकर यांना फरार आरोपी मिथुन काळे हा पुळूज परिसरात असल्याची माहिती मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार ओलेकर यांनी पथकासह पुळूज गाव गाठले. पोलीस पथकाला पाहताक्षणी काळे याने द्राक्षाच्या बागेतून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा पाठलाग करून पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या. काळे याच्यावर तालुका पोलीस ठाण्यात मोकांतर्गत गुन्हा दाखल आहे. अकलूज पोलीस ठाण्यात देखील त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. तो मागील चार वर्षांपासून फरार होता.
ग्रामीण पोलिसांकडून अट्टल गुन्हेगारांविरुद्ध मोहीम
सोलापूर जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते यांनी गंभीर गुन्ह्यातील रेकॉर्डवरील तसेच मोकांतर्गत कारवाई करण्यात आलेल्या आरोपींना जेरबंद करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच ग्रामीण पोलिसांकडून त्यासाठी विविध पथके तयार करण्यात आली आहे. अट्टल गुन्हेगारांना अटक करण्याची मोहीम सध्या पोलिसांकडून सुरू आहे.