सोलापूर - सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील सोलापूर विद्यापीठासमोरील महामार्गावरच चालणारा वेश्याव्यवसाय भीषण अपघातांना निमंत्रण देत आहे. राष्ट्रीय महामार्गावर पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाला. तो अपघातही या वेश्याव्यवसायामुळेच झाला असल्याचे ईटीव्ही भारतने केलेल्या पाहणीत समोर आले आहे. पाहुयात ईटीव्ही भारतचा हा स्पेशल रिपोर्ट.
सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावर सोलापूर शहरापासून १२ किलोमीटर अंतरावर सोलापूर विद्यापीठ आहे. या विद्यापीठासमोर रात्रीच्या वेळी राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणावर वेश्याव्यवसाय चालतो. यामुळे राष्ट्रीय महामार्गावर जड वाहनांची वाहतूक करणारे तसेच इतर चालक हे विद्यापीठाच्या समोर महामार्गावरच वाहने उभे करून वेश्या गमनासाठी जातात.
सोलापूर विद्यापीठाच्या समोरच सोलापूर महापालिकेचा जुना जकात नाका आहे. महापालिकेची जकात संपली असली तरी जकात नाक्यासाठी असलेली मोठी इमारत तशीच पडून आहे. हीच इमारत आता वेश्या व्यवसायाचा अड्डा बनली आहे. रात्रीच्या वेळी सोलापूर विद्यापीठ आणि जकात नाक्यांसमोर या वेश्या उभ्या राहत असतात. त्यांना पाहून चालक हे राष्ट्रीय महामार्गावरच आपली वाहने उभी करतात यामुळे या महामार्गावर वाहनांची रांग लागते.
याठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाहने उभी राहिल्याने पाठीमागून येणारी वाहने ही त्या उभ्या असलेल्या वाहनांवर आदळतात आणि अपघात होतात. सोलापूर विद्यापीठासमोर आतापर्यंत, असे अनेक लहान-मोठे अपघात झाले आहेत. त्यामुळेच राष्ट्रीय महामार्गवाल्यांनी हे ठिकाण ब्लॅक स्पॉट म्हणून जाहीर केलेले आहे. आजचा भीषण अपघात ज्या ठिकाणी झाला, त्या ठिकाणी ब्लॅक स्पॉट घोषित केलेला आहे. त्यामुळे याठिकाणी वाहने उभी करू नयेत, असा फलकही राष्ट्रीय महामार्ग विभागाच्यवतीने लावण्यात आलेला आहे. मात्र, त्याकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्यामुळे या ठिकाणावरील वेश्याव्यवसाय जोमात सुरू आहे आणि हाच वेश्याव्यवसाय अपघातांना निमंत्रण देत आहे. आजचा अपघात त्याचेच एक कारण आहे.