सोलापूर - आई वडिलांवरील कर्ज फेडण्यासाठी चालकाने ट्रक मालकाचीच रोकड लंपास केल्याची घटना जेलरोड पोलीस ठाणे हद्दीत घडली. याबाबत पोलिसांनी आरोपीला अटक केली असून 3 लाख 44 हजार रुपयांची रोकड जप्त केली आहे. भाऊसो वैजिनाथ गोडसे (वय 23 वर्ष, रा. गळवेवाडी, आटपाडी, जि. सांगली) असे संशयीत आरोपीचे नाव आहे.
रोहन शशिकांत जाधव (रा. आटपाडी, जि. सांगली) यांचा किराणा दुकानाचा व्यवसाय आहे. भाऊसो गोडसे हा त्यांच्या दोन वर्षापासून ट्रकवर चालक म्हणून काम करतो. भाऊसा गोडसे हा आटपाडीहून किराणा माल खरेदी करण्यासाठी सोलापूर येथील मार्केटयार्डात काल (गुरुवारी) आला होता. किराणा खरेदीसाठी मालकाने त्याला 3 लाख 44 हजार रुपये दिले होते. भाऊसो गोडसे याच्या आई वडिलांवर 4 ते 5 लाख रुपयांचे कर्ज होते. ते कसे फेडायचे या विवंचनेत भाऊसो गोडसे होता. त्यामुळे त्याने शक्कल लढवित मालकाने दिलेले 3 लाख 44 हजार रुपयाची रक्कम चोरीला गेल्याचा डाव रचला. शिवाय आयशर गाडीची काच फोडून चोरट्यांनी ही रक्कम लंपास केल्याचा बनाव रचला आणि चोरी झाल्याची माहिती मालकाला दिली. याबाबत माहिती मिळताच आटपाडी येथील किराणा दुकानचालक रोहन राऊत हे सोलापूरला आले आणि जेलरोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
पोलिसांकडून कसून चौकशी
जेलरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल होताच पोलिसांनी कसून चौकशी सुरू केली. ड्रायव्हरला कोणतीही मारहाण झाली नाही, फक्त गाडीची काच फोडली हे सर्व बनावट असल्याचे जाणवत होते. जेलरोड पोलिसांच्या डीबी पथकाने ड्रायव्हर भाऊसो गोडसे यास ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यावेळी त्याने 3 लाख 44 हजार रुपयांची चोरी केल्याचे कबूल केले आणि एका मित्राकडे ही रक्कम ठेवली असल्याची माहिती दिली. पोलिसांनी सर्व रक्कम हस्तगत केली आणि चालकावर गुन्हा दाखल केला. ही घटना उघडकीस आणण्यास पोलिसांना २४ तासांपेक्षा कमी वेळ लागला.