सोलापूर : सोलापुरात एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाला आहे. पूजेला फुल आणण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीचा भर बाजारपेठेत विनयभंग झाल्याने सोलापुरात खळबळ उडाली आहे. आजीने नातीला पूजेसाठी फुले घेऊन ये असे सांगितले होते. पीडित अकरा वर्षीय अल्पवयीन मुलगी शंभर रुपयांची नोट घेऊन मधला मारुती येथील बाजारपेठेत फुलारीच्या दुकानात सोमवारी सकाळी गेली होती. फुलारीने शंभर रुपयांचे सुट्टे नाहीत असे सांगून परत पाठवले. ती अल्पवयीन अकरा वर्षीय मुलगी परत जाताना, तिच्यासोबत एका नराधमाने झोंबाझोंबी करून तिचा विनयभंग केला आहे.
प्रतिकार करत मुलीने केली स्वतःची सुटका : अकरा वर्षीय अल्पवयीन मुलीने वेळेत लगेच प्रतिकार करून, स्वतःची सुटका करून घेतली. पीडितेने पळत घरी जाऊन आईला रडत रडत माहिती सांगितली. पीडित मुलीच्या नातेवाईकांनी ताबडतोब संबंधित संशयिताचा शोध घेतला असता, घटनास्थळवरून संशयित नराधम फरार झाला होता. अल्पवयीन मुलीच्या आई व आजीने सोमवारी रात्री फौजदार चावडी पोलीस ठाण्यात विनयभंग झाल्याची तक्रार दाखल केली आहे. अल्पवयीन मुलीला ओढताना तिच्या सोबत झोंबाझोंबी करताना सर्व दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस संशयिताचा शोध घेत आहेत.
भर बाजारपेठेत घडली घटना : पीडित अकरा वर्षीय मुलीच्या आजीला सोमवारी सकाळी पूजेला फुले पाहिजे होती. आजीने आपल्या नातीला फुले आणण्यास शंभर रुपये दिले होते. शहरातील मुख्य चौक असलेल्या मधला मारुती येथील फुलारी गल्लीत जाऊन फुले घेऊन ये असे सांगितले होते. पीडिता ही राहत्या घरातून पिशवी घेऊन फुले आणण्यासाठी बाजारपेठेत गेली होती. परंतु फुलांच्या दुकानदाराने शंभर रुपयांचे सुट्टे नाहीत असे सांगून पीडित मुलीला परत पाठवले. अल्पवयीन पीडित ही घरी परत जाताना, रस्ता निर्मनुष्य होता. सकाळची वेळ असल्याने वर्दळ देखील कमी होती. त्यावेळी एका संशयिताने पीडितेला अडविण्याचा प्रयत्न केला. तिचा हात धरून तिच्यासोबत झोंबाझोंबी केली. त्यावेळी पेपर टाकणारा व्यक्ती येत आहे, हे पाहून संशयिताने मुलीला सोडले. भर बाजारपेठेत अशी घटना घडल्याने सोलापुरातील महिला व तरुणींमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
सोलापूर पोलिसांच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित : शहरातील निर्मनुष्य रस्त्यावरून जाताना पीडित अल्पवयीन मुलीने मोठ्या चलाखीने स्वतःची सुटका करून घेत स्वतःला वाचवले. मुख्य चौक म्हणून ओळख असलेल्या मधला मारुती या परिसरात फुलांच्या बाजारपेठेत संशयित इसमाने एकट्या मुलीला पाहून हेरले होते. ऐनवेळी पेपरवाला आल्याने मोठी दुर्घटना टळली. सोलापूर शहरातील निर्मनुष्य रस्त्यावरून जाताना महिला वर्गांत भीतीचे वातावरण पसरले आहे. महिला व मुली सुरक्षित नाहीत अशी खंत व्यक्त केली जात आहे. घटना होऊन 24 तास उलटले तरी संशयित आरोपी पोलिसांना सापडला नाही. पोलीस प्रशासनाच्या कामकाजावर अनेक जण प्रश्न उपस्थित करत आहेत.
हेही वाचा -