सोलापूर - अवघे गरजे पंढरपूर, चालला नामाचा गजर...आषाढी एकादशीनिमित्त आज पंढरपूरमध्ये भक्तांचा जनसागर लोटला आहे. हरिनामाच्या गरजात अवघी पंढरी न्हाऊन निघाली आहे. विठ्ठलाचे दर्शन घेण्यापूर्वी वारकऱ्यांनी चंद्रभागेच्या तिरावर स्नानासाठी मोठी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले.
आज आषाढी एकादशी आहे. त्यानिमित्त पंढरपूरमध्ये विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक दाखल झाले आहेत. सर्व संतांच्या पालख्या कालच (गरुवारी) पंढरीत दाखल झाल्या आहेत. त्यामुळे पंढरपूरचा परिसर भक्तीरसात न्हाऊन निघाला आहे.
पंढरीचा वास चंद्रभागे स्नान आणिक दर्शन विठोबाचे... या संतवचनाप्रमाणे पंढरपूरला येणाऱ्या वारकऱ्यांच्या दृष्टीने चंद्रभागेच्या स्नानाला अत्यंत महत्व आहे. प्रथम भाविक चंद्रभागेत स्नान करतात, त्यानंतर पुंडलीकाचे दर्शन घेतात आणि मगच विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी भक्त विठ्ठल मंदिराकडे जातात.