पंढरपूर (सोलापूर) - राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. सांगलीनंतर आता सोलापुरातील तब्बल 81 एसटी कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यात चालक आणि वाहकांचा समावेश आहे.
मुंबईतील लोकल सेवा बंद असल्याने बेस्ट बस सेवेसाठी सोलापूर विभागातील 100 एसटी कर्मचारी मुंबईला गेले होते. रस्त्यांवरील गर्दीचे नियोजन करण्यासाठी बेस्ट उपक्रमात एसटीच्या एक हजार बसेस देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यासाठी अहमदनगर, सातारा, सांगली, सोलापूर, धुळे, रत्नागिरी, बीड, कोल्हापूर या विभागांमधून प्रत्येकी 100 बसेस आणि त्यावर 400 कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली होती. सोलापूर येथील कर्मचारी परत आल्यानंतर त्यातील काही जणांना ताप, सर्दी, खोकला यासारखी कोरोनाची लक्षण दिसत होती. त्यानंतर सर्व कर्मचाऱ्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली. चाचणीत तब्बल 81 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. सध्या सर्व कर्मचाऱ्यांवर रुग्णालयात उपचार सुरु आहे.
मुंबईत 15 दिवसांची सेवा बजावल्यानंतर आपापल्या विभागात जाऊन या कर्मचाऱ्यांनी कोरोना चाचणी केल्यानंतर सांगली विभागातील कर्मचाऱ्यांमध्ये सर्वाधिक 100 कर्मचाऱ्यांना कोरोना झाल्याचे आढळून आले.
- सांगलीतील 106 एसटी कर्मचाऱ्यांना झाला होता कोरोना -
मुंबईमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकल सेवा बंद असल्याने प्रवासी सेवा देण्यासाठी बेस्टच्या मदतीला सांगली जिल्ह्यातूनही एसटी बसेस पाठवण्यात आल्या होत्या. सांगली आगारातून 13 ऑक्टोबर रोजी सुमारे 200 गाड्या या मुंबईत प्रवासी वाहतुकीसाठी पाठवण्यात आल्या होत्या. जिल्ह्यातील 9 एसटी आगारातून 100 चालक, 200 वाहक आणि इतर 25 असे एकूण 425 कर्मचारी मुंबईला पाठवण्यात आले होते. 10 दिवसांची सेवा करून परतल्यानंतर सर्वांची कोरोना टेस्ट करण्यात आली होती, तेव्हा तब्बल 106 चालक आणि वाहकांचा रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आला आहेत. त्यामुळे सांगली एसटी प्रशासन हादरून गेले आहे. दरम्यान या कोरोनाबाधित एसटी कर्मचाऱ्यांमध्ये जिल्ह्यातील 9 डेपोतील कर्मचारी आहेत. ज्यामध्ये सांगली डेपोचे 6, मिरज 6, आटपाडी 15, जत 15, कवठेमहांकाळ 14, इस्लामपूर 6, विटा 14, तासगाव 24 आणि शिराळा आगारमधील 6 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तर काही कोरोनाबाधित कर्मचाऱ्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, तर काही जणांना होम क्वारंटाइन करण्यात आले आहे.
- राज्यातील कोरोना परिस्थिती -
राज्यात गुरुवारी 5 हजार 902 नवीन रुग्णांचे निदान झाले. तर 7 हजार 883 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण 14 लाख 94 हजार 809 कोरोनाबाधित बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 89.69 टक्के एवढे झाले आहे. याचबरोबर राज्यात 156 कोरोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद झाली. आतापर्यंत एकूण 43 हजार 710 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 2.62 टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 88 लाख 37 हजार 133 नमुन्यांपैकी 16 लाख 66 हजार 668 (18.86 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 25 लाख 33 हजार 687 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तर 12 हजार 690 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात सध्या एकूण 1 लाख 27 हजार 603 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.