सोलापूर - माढा तालुक्यात अरणच्या खंडोबा यात्रेनिमित्त देवस्थान पंचकमिटीच्यावतीने श्वानांच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत सातारा येथील गोल्डन ग्रुपच्या 'केटीम'ने प्रथम क्रमांक मिळवला आहे. तर टायगर ग्रुप घरनिकी पारगाव यांच्या 'खडका' आणि वाई तालुका रेसिंग क्लब यांच्या 'मधुरा' या श्वानांनी अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावला आहे. त्यांच्या मालकांना अनुक्रमे 15000 रुपये, 10000 रुपये, 7000 रुपये आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
परंपरेप्रमाणे अरण येथे खंडोबाची यात्रा साजरी केली जाते. यात्रेमध्ये पूर्वी बैलगाड्यांची शर्यत घेतली जात होती. मात्र, आता तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे शेती करण्याच्या पद्धतीत बदल झाल्याने बैलांची संख्या सध्या कमी आहे. त्यामुळे ही बैलगाडीच्या शर्यतीची प्रथा बंद झाली होती. यानंतर यात्रेत गेल्या 2 वर्षांपासून श्वानांची शर्यत घेतली जात आहे. सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, उस्मानाबाद या 5 जिल्ह्यातील ग्रे हाऊंड जातीचे सुमारे 56 श्वान या स्पर्धेत सहभागी झाले होते. दिडशे मीटर अंतराच्या सुमारे 20 फेऱया घेत प्रथम क्रमांक काढण्यात आला. या स्पर्धेचे निवेदन प्रकाशबुवा महागांवकर (सातारा) यांनी केले. यशवंत शिंदे व किसन जाधव यांच्याहस्ते रोख 15 हजार रूपये, सन्मानचिन्ह देवून सन्मानित करण्यात आले.
श्वानांच्या धावण्याचं महाराष्ट्रात सर्वात मोठे मैदान पुसेगाव सावळी याठिकाणी होते. सुरुवातीला या स्पर्धा पंजाब येथे होत होत्या. त्या पाहून श्वान शौकिनांनी प्रथम खटावमध्ये स्पर्धांना सुरुवात केली.
कशी असते श्वानांची धावण्याची शर्यत?
प्रथम यात्रा कमिटीच्या मार्फत मऊ मातीची धावपट्टी केली जाते. ही धावपट्टी 200 मीटर लांब आणि 5 मीटर रुंद मीटर लांब आणि 5 मीटर रुंद असते. खिळ्याच्या यांच्या सहाय्याने तार बांधली जाते आणि तारेच्या जवळ प्रतिकृती असलेली बाहुली बांधली असते. प्रत्येक फेरीमध्ये 2 श्वानांची स्पर्धा असते. हे श्वान सोडण्यासाठी एका व्यक्तीची नेमणूक केली जाते. त्या व्यक्तीला काढणी मेकर असे म्हणतात. तर दुसऱ्या बाजूला तार ओढण्यासाठी एका व्यक्तीची नेमणूक केलेली असते. तारे बरोबर बाहुलीसुद्धा ओढली जाते. बाहुलीला पकडण्यासाठी श्वान धावत असतात. 140 मीटरवर स्पर्धेची अंतिम रेषा आखलेली असते. सर्वात आधी जो श्वान ही रेषा पार करेल तो विजयी घोषित केला जातो. ही स्पर्धा बाद फेरी पद्धतीने खेळवली जाते.