सोलापूर - पंढरपूर विधानसभा मतदार संघाच्या पोट निवडणुकीसाठी 524 मतदान केंद्रावर मतदान घेतले जाणार आहे. पंढरपूर विधानसभा मतदार संघात या अगोदर 328 मतदान केंद्रावर मतदान घेतले जात होते. मतदारांची संख्या वाढल्याने तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एक हजार पेक्षा जास्त मतदान असणाऱ्या मतदान केंद्रासाठी 196 सहायक मतदान केंद्रे स्थापन करण्यात आली असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी गजानन गुरव यांनी दिली. यासाठी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील राजकीय पदाधिकाऱ्यांशी देखील विचारविनिमय करण्यात आला.
विविध राजकीय पक्षांची बैठक -
पंढरपूर विधानसभा मतदार संघाच्या पोट निवडणुकीसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून लवकरच निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रांत कार्यालयात एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, तहसीलदार सुशिल बेल्हेकर, स्वप्निल मरोड, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.एकनाथ बोधले, निवडणूक नायब तहसीलदार सुरेश तिटकारे तसेच विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विशेष दक्षता -
पंढरपूर विधानसभा मतदार संघ पोट निवडणुकीसाठी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मतदान केंद्रावर आवश्यकती काळजी घेतली जाणार आहे. मतदान केंद्राच्या नावात बदल, पुर्वीच्या मतदान केंद्राची इमारत मोडकळीस आल्याने मूळ मतदान केंद्राच्या ठिकाणी नवीन इमारत प्रस्तावत करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर सहाय्यकारी मतदान केंद्राच्या ठिकाणी झालेला बदल, नावात झालेला बदल याबाबतची सर्व माहिती राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना दिला जाणार आहे. यामध्ये काही बदल सुचवायचे असतील तर तात्काळ बदल सुचवावेत, असेही गुरव यांनी सांगितले.
पंढरपूर मतदारसंघातील 42 मतदान केंद्रांच्या नावात बदल -
पंढरपूर विधानसभा मतदार संघ पोट निवडणुकीसाठी एकूण 42 मतदान केंद्राच्या नावांमध्ये बदल झाला आहे. पंढरपूर शहर 22, ग्रामीण 2 तसेच मंगळवेढा येथील 28 केंद्राच्या नावात बदल झाले. मतदार यादीत छायाचित्र नसलेल्या मतदारांचे फोटो संकलित करण्याबाबत संबधितांनी बीएलए नेमून बीएलओनां सहकार्य करावे. तसेच ज्यांचे वय 1 जानेवारी 2021 पर्यंत 18 वर्षे पूर्ण झाले आहे. त्यांनी मतदार नोंदणी करावी. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर कोणालाही मतदार नोंदणी करता येणार नाही, असेही गुरव यांनी स्पष्ट केले.