पंढरपूर - राज्यात कोरोनाचा कहर वाढत आहे. मात्र सोलापूर जिल्ह्यातून एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. गेल्या दहा महिन्यांमध्ये तब्बल 50 हजार जणांनी कोरोनावर मात केली आहे. तस सध्या जिल्ह्यात 795 कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. कोरोनावर मात करणाऱ्यांचे प्रमाण जिल्ह्यात 95 टक्क्यांवर पोहोचले आहे. गेल्या दोन दिवसांमध्ये जिल्ह्यात 192 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.
पंढरपूरमध्ये कोरोना प्रादुर्भाव वाढला
सोलापूर जिल्ह्यात बुधवारी 95 तर गुरुवारी 97 कोरोनाबाधित आढळून आले आहेत. पंढरपूर, बार्शी, मोहोळ या तालुक्यांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या दुप्पट झाली आहे.पंढरपूर शहरामध्ये कोरोनाबाधितांची संख्या 50 च्या पुढे गेली आहे. कोरोनाला अटकाव करण्यासाठी तालुका प्रशासनाकडून उपाययोजना करण्यात येत असून, उपजिल्हा रुग्णालयामध्ये कोविड विभागाची निर्मीती करण्यात आली आहे.
जिल्ह्यात 7 मार्चपर्यंत रात्रीची संचारबंदी
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात 7 मार्चपर्यंत रात्रीच्या संचारबंदीचे आदेश पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले आहेत. त्यानुसार जिल्ह्यात रात्री 11 ते सकाळी 5 वाजेपर्यंत संचारबंदी असणार आहे. तसेच सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करतेवेळी मास्क बंधनकारक करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व सीमारेषांवर नाकाबंदी करण्यात आली आहे.
जिल्हा प्रशासनाकडून विविध उपाययोजना
कोरोनाचा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी आरोग्य विभागाकडून परत एकदा कोरोना चाचण्यांची मोहीम राबवण्यास सुरुवात झाली आहे. तसेच चाचणी शिबिर घेण्यात येत आहेत. जिल्ह्यातील नगरपालिका व ग्रामपंचायतींकडून मास्क न वापरणार्यांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यास सुरुवात झाली आहे.
कोरोनामुळे जिल्ह्यात 1830 जणांचा मृत्यू
सोलापूर जिल्ह्यामध्ये पहिला कोरोनाचा रुग्ण एप्रिल महिन्यात आढळला होता. त्यानंतर सोलापूर जिल्ह्यामध्ये ऑक्टोबर महिन्याच्या शेवटी कोरोना रुग्ण संख्येमध्ये घट दिसून आली. कारण त्यावेळी चाचणी करण्याचे प्रमाणही कमी झाले होते. मागील आठवड्यापासून कोरोनाबाधितांचे किंचित प्रमाणात वाढताना दिसत आहे. मागील दहा महिन्यांच्या काळापासून जिल्ह्यात एकूण 6 लाख 78 हजार 341 जणांची तपासणी करण्यात आली आहे. त्यामध्ये 52 हजार 680 जण कोरोनाबाधित आढळून आले. त्यातील 50 हजार 55 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर 1 हजार 830 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून, जिल्ह्यात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण 7.7 टक्के एवढे आहे.