बार्शी (सोलापूर) : दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे सोई-सुविधा पुरवण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत. ग्रामीण भागातील रुग्णांवर त्याच ठिकाणी उपचार करण्याच्या दृष्टीने तालुक्यातील पांगरी येथेही 50 बेडचे कोरोना सेंटर उभारण्यात आले आहे.
बार्शी शहरासह तालुक्यात दिवसाकाठी 150 ते 200 रुग्ण वाढत आहेत. बार्शी येथील ग्रामीण रुग्णालय तसेच उभारण्यात आलेल्या 8 कोविड सेंटरमध्ये कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. परंतु, शहराला लागून असलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम, परांडा या तालुक्यातील रुग्णही बार्शी येथेच दाखल होत आहेत. यामुळे यंत्रणेवरील ताण वाढत असल्याने आता तालुक्यातील पांगरी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहे. यावेळी आमदार राजेंद्र राऊत, प्रांत अधिकारी हेमंत निकम यांची उपस्थिती होती. या कोविड सेंटरमुळे लगतच्या 15 गावातील रुग्णांवर उपचार या ठिकाणी होणार आहेत. तर 20 ऑक्सिजन बेडचीही सोय करण्यात आली आहे. गेल्या 15 दिवसांपासून शहरासह ग्रामीण भागात कोरोना रुग्ण हे वाढत आहे. वेळीच उपचार व्हावेत शिवाय रुग्णाची हेळसांड होऊ नये म्हणून कोविड सेंटर सुरू करण्यात आल्याचे आमदार राजेंद्र राऊत यांनी सांगितले आहे. तर बार्शी येथील सेंटर प्रमाणेच पांगरीच्या सेंटरमध्ये सोई- सुविधा दिल्या जाणार असल्याचे प्रांत अधिकारी निकम यांनी स्पष्ट केले आहे. यावेळी पंचायत समितीचे सभापती अनिल डीसले, तहसीलदार सुनील शेरखाने, गटविकास अधिकारी शेखर सावंत यांची उपस्थिती होती.
लक्षणे असणाऱ्या ग्रामस्थांनी तपासणी करून घ्यावी-
'ग्रामीण भागात आजही ग्रामस्थ अंगावर आजार काढतात. मात्र, कोरोनावर वेळीच उपचार झाले नाहीत तर आजार बळावतो. त्यामुळे ग्रामस्थांनी मनात कोणतीही भीती न बाळगता प्राथमिक तपासणी करून घेणे आवश्यक आहे. शिवाय कोरोना साखळी तोडण्यासाठी घालून दिलेल्या नियमांचे पालनही करणे आवश्यक आहे', असे मत राजेंद्र राऊत यांनी म्हटले आहे.