पंढरपूर- भीमा नदी पात्रातून अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्या ३६ गाढवांवर पंढरपूर पोलिसांनी कारवाई केली होती. आता त्या गाढवांची रवानगी चक्क थंड हवामानासाठी प्रसिद्ध असलेल्या उटी येथील इंडिया प्रोजेक्ट फॉर अनिमल अँड नेचर संस्थेच्या कोंढवाड्यात करण्यात येणार आहे.
वाळू माफियांकडून गुन्हे टाळण्यासाठी गाढवांचा वापर
पंढरपूर शहर व तालुक्यात भीमा नदीकाठी अहोरात्र वाळू उपसा करणार्या माफियांनी थैमान घातले आहे. त्यातच पोलीस प्रशासनाकडून आवैधरित्या वाळू उपसा करणार्या वाहनांवर कारवाई करण्यात येते. याच कारवाईपासून वाचण्यासाठी वाळूमाफियां वाळू चोरी करण्यासाठी गाढवांचा वापर करताना दिसतात. काही दिवसांपूर्वी पंढरपूर पोलीसांनी आवैधरित्या वाळू नेणाऱ्या ३६ गाढवांवर कारवाई करत ताब्यात घेतले होते. त्याच गाढवांची आता तमिळनाडू राज्यातील उटी या ठिकाणी रवानगी करण्यात आली आहे.
पोलीस प्रशासनाकडून तीन ठिकाणी गाढवांवर कारवाई
पंढरपूर शहरातील सरडा भवन येथे भीमा नदीपात्रातून वाळू उपसा करणार्या ११ गाढवांवर तर जुना अकलूज रोड जॅकवेल जवळील नदीच्या पात्रातून सुमारे 18 गाढवांवर कारवाई करण्यात आली होती. त्याच बरोबर खडकी देवीच्या मंदिरातून वाळू उपसा करून वाहून घेणाऱ्या सात गाढवंवरती लादून घेऊन जाताना दिसून आले, असे एकूण 36 गाढव पंढरपूर शहर पोलीस ठाण्यांमध्ये आणण्यात आले होते. या गाढवांच्या मालकांची माहिती पोलिसांना न मिळाल्यामुळे अखेर या गाढवांची रवानगी उटी रवानगी करण्यात आली आहे.
प्रथमवर्ग न्यायाधीश यांच्या आदेशानुसार गाढवांची रवानगी
पोलीस प्रशासनाकडून करण्यात आलेल्या कारवाई संदर्भात पंढरपूर प्रथम वर्ग न्यायाधीश यांच्या आदेशानुसार गाढव प्राण्यांना पुढील योग्य त्या सुरक्षिततेच्या कामी इंडिया प्रोजेक्ट फॉर अनिमल इंडिया प्रोजेक्ट फॉर अनिमल ॲण्ड नेचर संस्था, निलगिरी, उटीकडे रवाना करण्यात आली आहेत. गाढव प्राण्यांना ठेवण्यासाठी महाराष्ट्रात कोठेही कोंढवाडा नाही. त्या गाढवांना चार दिवस चारा टाकण्याचे काम पोलीस कर्मचारी करत होते. तसेच गाढवे पळून जाऊ नये, यासाठी २ होमगार्ड यांचा बंदोबस्त लावण्यात आला होता. त्यामुळे पोलीस प्रशासनाकडून या 36 गाढवांना सकाळी वाहनांमध्ये बसवून उटीच्या दिशेने रवानगी करण्यात आली.