सोलापूर - जिल्ह्याच्या ३३९.७७ कोटी रुपयांच्या २०१९-२० च्या जिल्हा वार्षिक योजनेच्या प्रारुप आराखड्यास मंजुरी देण्यात आली. वित्त आणि नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात झालेल्या बैठकीत ही मंजुरी देण्यात आली.
विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या या बैठकीस वित्त व नियोजन राज्यमंत्री दीपक केसरकर, पशुसंवर्धन व दुग्धविकासमंत्री महादेव जानकर, सोलापूरचे पालकमंत्री विजय देशमुख, सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, अतिरिक्त जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड जिल्हा नियोजन अधिकारी सर्जेराव दराडे आदी उपस्थित होते.
सोलापूर जिल्ह्यासाठी ३३९.७७ कोटी रुपयांचा आराखडा आहे. त्यापैकी २१७.८० कोटी रुपये गाभा तर १०४.९८ कोटी रुपये बिगर गाभा क्षेत्रासाठी राखीव ठेवण्यात आले असल्याची माहिती अप्पर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांनी दिली. नाविन्यपूर्ण योजनेसाठी सुमारे १५ कोटी तर मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेसाठी सुमारे ५१ कोटी रुपयांचा निधी राखीव ठेवण्यात आला आहे.
जिल्ह्यातील विविध विकास कामांसाठी अतिरिक्त निधी मिळावा, अशी मागणी अतिरिक्त जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांनी बैठकीत केली. त्यावर रस्ते, सिंचन, आरोग्य, शिक्षण आणि पाणीपुरवठा योजनेसाठी अधिकचा निधी देण्याचा विचार करू, असे नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. जिल्हा परिषद अध्यक्ष संजय शिंदे यांनी स्वच्छ भारत मोहिमेच्या अंतर्गत विविध कामांसाठी निधी द्यावा, अशी मागणीही यावेळी केली.