सोलापूर- जिल्ह्यातील एकूण ११ विधानसभा मतदारसंघासाठी २८५ जणांनी ३७३ उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. ४ सप्टेंबर हा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. शेवटच्या दिवशी एकूण १८१ जणांनी २४५ उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
उमेदवारी अर्ज दाखल करायच्या शेवटच्या दिवशी माढा विधानसभेसाठी विद्यमान आमदार बबनदादा शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर करमाळा मतदारसंघातून जिल्हा परिषदेचे विद्यमान अध्यक्ष संजय शिंदे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. संजय शिंदे यांनी राष्ट्रवादी पक्षाकडून माढा लोकसभेची निवडणूक लढली होती. विधानसभेसाठी मात्र त्यांनी करमाळा मतदारसंघातून अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
शिवसेनेचे विद्यमान आमदार नारायण पाटील यांनी देखील अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. करमाळा मतदारसंघातून नारायण पाटील यांची बंडखोरी अटळ आहे. माळशिरस मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून उत्तम जानकर तर भाजपकडून राम सातपुते यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अक्कलकोट मतदारसंघासाठी भाजपकडून सचिन कल्याणशेट्टी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
हेही वाचा- तुम्ही मला माझ्या विकास कामांमुळे नाकारणार नाही - नारायण पाटील
पंढरपूर विधानसभेसाठी भाजपकडून सुधाकरपंत परिचारक यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर शैला गोडसे, समाधान आवताडे यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरला आहे. मोहोळ मतदारसंघातून रमेश कदम यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. सव्वा चार वर्षांपासून ते तुरुंगात होते. उच्च न्यायालयाने त्यांना निवडणुकीसाठी जामीन अर्ज मंजूर केला आहे. त्यानंतर रमेश कदम यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
हेही वाचा- सांगोल्यात संजय पाटील यांनी हेलिकॉप्टरने येऊन दाखल केला उमेदवारी अर्ज