सोलापूर- राज्यपाल कार्यालयाच्यावतीने पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात २३ व्या महाराष्ट्रराज्य आंतर विद्यापीठ क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यापीठाचे कुलपती तथा महाराष्ट्राचे राज्यपाल महामहीम भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते दिनांक २६ डिसेंबर २०१९ रोजी सकाळी ९ वाजता या स्पर्धांचे उद्घाटन होणार आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस असणार आहेत. याप्रसंगी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. व्ही.बी. घुटे, क्रीडा विभागाचे संचालक डॉ. एस.के. पवार, कुलपती नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य महेश माने यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या इतिहासात प्रथमच राज्यस्तरीय आंतर विद्यापीठ क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे. या भव्य क्रीडा महोत्सवासाठी विद्यापीठाने जय्यत तयारी केली असून विद्यापीठ परिसराला क्रीडानगरीचे स्वरुप प्राप्त झाले आहे. या आयोजनासाठी विद्यापीठाने १५ मैदाने तयार करून घेतली आहेत. या आंतर विद्यापीठ क्रीडा स्पर्धेला महाराष्ट्रातील २० विद्यापीठांचे जवळपास २ हजार ७०० विद्यार्थी व संघ व्यवस्थापक उपस्थित राहणार आहेत.
आयोजनासाठी ७० विविध समित्या गठित
क्रीडा महोत्सवाच्या आयोजनासाठी ७० विविध समित्या गठित करण्यात आल्या असून या समित्यांमार्फत सर्व तयारी करण्यात आली आहे. विद्यापीठ परिसरात हॉली बॉलची चार मैदाने, बास्केट बॉलची दोन मैदाने, कबड्डीची चार मैदाने, खो-खोची चार मैदाने, तसेच मैदानी स्पर्धेसाठीचा ट्रॅक निर्माण करण्यात आलेला आहे. या पाच स्पर्धा विद्यापीठाच्या परिसरात होणार आहेत. या व्यतिरिक्त सहावी स्पर्धा विद्यापीठाच्या इच्छेनुसार आयोजित करावयाची असते. यात विद्यापीठाने हॅण्डबॉल स्पर्धेचे आयोजन केले असून ही स्पर्धा सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या परिसरातील चार मैदानांवर होणार आहे. क्रीडा स्पर्धेत सहभागी होण्यासाठी विविध विद्यापीठातील मुला-मुलींचे संघ येणार आहेत.
हेही वाचा-पंढरपूरचा केंद्रीय पर्यटन सूचीमध्ये समावेश करावा - अखिल भारतीय वारकरी मंडळी