सोलापूर - जिल्ह्यात व शहरात 12 एप्रिलपासून कोरोनाने शिरकाव केला. त्या तारखेपासून आजतागायत सोलापूर शहर व जिल्ह्यात कोरोना आजाराने एकच थैमान मांडले आहे. दिवसेंदिवस परिस्थिती बिकट होऊन 5 ऑक्टोबरपर्यंत प्राप्त झालेल्या अहवालानुसार सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील एकूण 215 पोलिसांना कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती प्रभारी पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी दिली.
चीन या देशामधील वुहान या शहरातून पसरलेल्या आजाराने जगभरात कोरोना विषाणूजन्य आजाराने आपले पाय पसरले आहे. भारतात देखील जानेवारी महिन्यापासून या आजाराने शिरकाव करण्यास सुरुवात केली. भारतात 30 जानेवारी रोजी पहिला बाधित रुग्ण आढळला. कोविड-19 या विषाणूची लागण झालेला पहिला रुग्ण केरळमध्ये आढळला होता. हा रुग्ण वुहान या शहरात वैद्यकीय शिक्षण घेत होता. याला कोरोनाची लागण झाल्याचे समोर येताच त्यावर उपचार करण्यात आले आणि त्याची तब्येत सद्यस्थितीत सुखरूप आहे.
सोलापुरात देखील 12 एप्रिलपासून या कोविड-19 विषाणूने आपले पाय पसरण्यास सुरुवात केली. लॉकडाऊन मध्येच शहरात पहिला रुग्ण आढळला होता. शहरातून ग्रामीण भागात याचा शिरकाव सुरू झाला. पोलिसांना देखील याची लागण होण्यास सुरुवात झाली. सद्यस्थितीत सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील 215 पोलिसांना याची लागण झाली आहे. तर 3 पोलिसांना यामुळे आपला जीव गमवावा लागला. यात 1 पोलीस अधिकारी व 2 पोलीस कर्मचारीचा सामावेश आहे. सद्यस्थितीत 1 अधिकारी व 23 कर्मचारी रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत.
ग्रामीण सोलापूरात 26 हजारांपेक्षा अधिक रुग्ण -
रविवार 4 ऑक्टोबरपर्यंत मिळालेल्या अहवालानुसार, ग्रामीण भागात एकूण 26 हजार 300 बाधित रुग्ण आहेत. त्यामध्ये 16 हजार 232 पुरुष तर 10 हजार 68 स्त्रियांचा समावेश आहे व तसेच 715 रूग्ण कोरोना आजाराने दगावले आहेत. यामध्ये 506 पुरुष व 209 स्त्रिया आहेत.