माढा (सोलापूर) - राजकारणात आजची तरुणाई हिरीरीने सहभागी होताना दिसत आहे. विशेष म्हणजे फक्त सहभागीच होत नाही तर ग्रामस्तरावरही निवडणूक जिंकून सरपंच पदावर विराजमान होण्याची किमया करत आहे. याचाच तालुक्यातील सुलतानपूर येथे आला आहे. सुलतानपुरच्या सरंपचपदी अवघ्या 21 वर्षाचा रोहनराज हनुमंत धुमाळ हा तरुण बिनविरोध विराजमान झाला आहे. वयाच्या २१ व्यावर्षीच गावाच्या सरपंचपदावर मोहर उमटवल्याने सर्वात कमी वयाचा सरपंच म्हणून त्याची जिल्ह्यात चर्चा होत आहे. तर उपसरपंचपदी कल्पना अनिल शिंदे यांना संधी मिळाली आहे.
नामांतराचा विषय मार्गी लावणार -
26/11ला झालेल्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात सुलतानपुरचे राहुल शिंदे यांनी हौतात्म्य पत्करलं आहे. यामुळे सुलतानपुर गावाला विशेष महत्त्व आहे. याच पार्श्वभूमीवर या गावाचे नाव आता रोहनच्या कमी वयाच्या सरपंच निवडीवरुन समोर आले आहे. विकासाचे व्हिजन घेऊन गावाचा कायापालट करणार असल्याचा निर्धार घेत अनेक वर्षांपासुन गावाला राहुलनगर नामांतर करण्याचा विषय प्रशासकीय पातळीवर अडकुन पडला आहे. तो प्रश्न मार्गी लावणार असल्याचे रोहनने बोलताना सांगितले.
गावात प्रभाग क्र. एकमधुन रोहन याने महाविकास आघाडीच्या पॅनलमधुन निवडणुक लढवली होती. यात तो ९६ मतांनी विजयी झाला. त्याला नवनियुक्त सदस्यांसह ग्रामस्थांनीही सरपंच होण्यासाठी सहमती दर्शवली. तालुक्यातील 82 सरपंच निवडीचा कार्यक्रम मंगळवारी पार पडला. निवडी वेळी सरपंच पदासाठी रोहन धुमाळ या एकट्याचा अर्ज आल्याने त्यांची निवड अध्यासी अधिकारी एस.जे.पोळके, वाय.वाय.तळेकर यांनी बिनविरोध झाल्याचे घोषित केले. यानंतर ग्रामस्थांसह नवनियुक्त सदस्यांनी रोहनराजचा सत्कार केला.
हेही वाचा - मुलाच्या आत्महत्येची खोटी बातमी देणाऱ्या वृत्त वाहिनीवर शेखर सुमन करणार कायदेशीर कारवाई
कोणताही राजकीय वारसा नसताना...
रोहन माढ्यातील रयत शिक्षण महाविद्यालयात शिक्षण घेत शेती करतो आहे. आता रोहनच्या खांद्यावर आणखी एक जबाबदारी आली आहे. शिक्षण, शेती बरोबरच त्याला गावाचा कारभार हाकावा लागणार आहे. कसलाही राजकीय वारसा नसतानाही या सामान्य शेतकरी दाम्पत्याच्या मुलाने राजकारणाच्या पहिल्याच इनिंगमध्ये यश मिळवल्याने त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. आई सुनिता आणि वडील हनुमंत यांना मुलगा सरपंच झाल्याचे पाहुन आनंदाश्रुंना आवरता आले नाही.